
जमिनीचे पुनर्भरण : वाढलेला भूजलस्तर ठरणार जिरायतीसाठी पोषक
अमरावती : दोन महिन्यांपासून सतत पाऊस होत आहे. या पावसाने भूजलाचे पुनर्भरण झाल्याने भूजलस्तरात वाढ झालेली आहे. पावसाने शेतात पाणी साचून पिके पिवळी पडली, वाढ खुंटली, कीड रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांच्या सरासरी उत्पन्नात कमी येणार आहे. मात्र, जमिनीत वाढलेल्या आर्द्रतेने रब्बी हंगामाची क्षेत्रवाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
यंदाच्या पावसाळ्याचे फक्त पाच दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. मात्र, दोन महिन्यांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे व अधूनमधून दमदार पाऊसही होत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे जमिनीत पुनर्भरण झाल्याने सर्वच तालुक्यांतीत जमिनीत आर्द्रता वाढली आहे व भूजलस्तरात वाढ झाल्याने प्रामुख्याने जिरायती रब्बी पिकांसाठी पोषक स्थिती आहे.
जिल्ह्यात १ जून ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पावसाची ८३६.४ मिमी सरासरी आवश्यक असताना प्रत्यक्षात ७६९.७ मिमी पाऊस झालेला आहे. ही ९२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला ५७८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. ही ६९.२ टक्केवारी होती. सध्या परतीच्या पावसाची रिपरिप तीन दिवसांपासून सुरू आहे, शिवाय पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रब्बी हंगामात क्षेत्रवाढ होण्याची शक्यता गतवर्षी रब्बी हंगामात १.६० लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र दोन लाख हेक्टरवर पेरणी होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
यामध्ये प्रामुख्याने जिरायती क्षेत्रात वाढ होणार आहे व हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. खरिपात सततचा पाऊस,अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशीचे नुकसान होत असल्याने काही शेतकरी पिकांवर ट्रॅक्टर फिरवत असल्याचे चित्र आहे. हे क्षेत्रदेखील रब्बी पिकात रूपांतरित होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात रबीची क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







