
बडनेरा/अंजनगाव बारी : साथ जियेंगे, साथ मरेंगे अशी वचने घेऊन भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणाऱ्या प्रेमीयुगुलाला आपल्या वाटेतील खाचखळगे लक्षात येताच त्यांनी जीवन संपवण्याचा निश्चय केला आणि तो अमलातदेखील आणला. त्यांच्या या पावित्र्याने अंजनगाव बारी येथील शेजारी असलेल्या दोन कुटुंबांना दुःखाच्या सागरात लोटले आहे. अंजनगाव बारी येथील शेजारी राहणाऱ्या तरुण-तरुणीने रेल्वे गाडीखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास समोर आली. बडनेरा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. मुलीच्या मोठ्या वडिलांनी याबाबत फिर्याद नोंदविली होती. त्यानुसार, धाकट्या भावाची १७ वर्षीय मुलगी २१ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजता घरून निघून गेली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. यादरम्यान रायसोनी कॉलेजनजीक रेल्वे रुळाजवळ तरुण व तरुणी मृतावस्थेत आढळली. ती भावाची मुलगी असल्याचे समोर आले.
दरम्यान, नंदू काशीनाथजी आतराम (रा. अंजनगाव बारी) यांचा मुलगा अमन नंदू आतराम (१८) हादेखील २१ ऑक्टोबर रोजीच पहाटे साडेतीन वाजता ट्रॅक्टरच्या कामाकरिता अमरावतीला जातो, असे सांगून घरून निघून गेला होता. त्यानंतर पहाटे ५ वाजता गावातील काही लोकांनी निदानजी महाराज यांचे मंदिराजवळील रेल्वे रुळावर तरुण-तरुणीचा मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. त्यामुळे नंदू आतराम हे घटनास्थळी गेले. मृत तरुण हा अमन असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बडनेरा पोलिसांनी पंचनामा केला. दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आले. मंगळवारी दोघांवरही अंत्यसंस्कार झाले. मृत तरुण व तरुणी हे शेजारी राहत होते. ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचे पोलिसांना तपासाअंती पुढे आले. मृतदेहाची ओळख पटल्यावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







