
अमरावती : प्रतिनिधी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. निवडणूक आयोगाने सी व्हिजिल सिटिझन अॅप विकसित केले आहे. या अॅपवर दाखल होणाऱ्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाणार आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत ४९ तक्रारी केल्या आहेत.
आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करू नये, याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वपिक्षा अधिक सुलभ झाले आहे.
आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल अॅप विकसित केले आहे. या मोबाइल अॅपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सी व्हिजिलवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते.
तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते. सीव्हिजिल अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त अॅप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचा तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







