
अमरावती : गांजा वा गुटखा तस्करीसाठी तस्कर काय करतील, याचा काही नेम नाही. असाच एक अफलातून प्रकार येथील पंचवटी चौकात उघड झाला. शहर गुन्हे शाखेच्या क्राइम युनिट दोनच्या पथकाने दोन तस्करांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्या कपड्यांआड अंगाला कपड्यांत गुंडाळलेला ९ किलो ७३५ ग्रॅम गांजा आढळला. ७ नोव्हेंबर रोजी रात्री स्थानिक पंचवटी चौकात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. सादिक शहा बिसमिल्ला शाह (४०, रा. लालखडी, इमाम नगर, अमरावती) व शेख महबूब शेख रुस्तम (६०, रा. इतवारी बाजार, वर्धा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पंचवटी चौक येथे दोन व्यक्ती गांजाची तस्करी करून त्याची विकी करण्याचे उद्देशाने येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या आधारे, पंचवटी चौकात सापळा रचण्यात आला. त्यावेळी वेलकम टी-पॉईंटकडून पंचवटी चौकात येत असलेल्या दोन संशयितांकडे चौकशी करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींच्या अंगावर कपड्यांच्या आत पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये गांजा आढळला. आरोपींकडे आढळलेला १ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा ९.७३५ किलो ग्रॅम गांजा व १२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा एकूण २ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई: पोलिस आयुक्त नवीनचंद रेड्डी, उपायुक्त कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमुख तथा पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे, उपनिरीक्षक संजय वानखडे, अंमलदार अजय मिश्रा, दीपक सुंदरकर, निखिल माहोरे, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, सागर ठाकरे, राहुल दुधे यांनी ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







