
अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी मोर्शी तालुक्यातील धारूळ ते चिंचोली रोडवरील थांब्याच्या बाजूने कारवाई करीत एका दुचाकीहून ७० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली.
तपासणीदरम्यान एमएच २७ एपी १३९९ या दुचाकीच्या मागील सीटवर नॉयलानच्या पोत्यात दोरीच्या साहाय्याने बांधलेल्या रबरी ट्यूबमध्ये ती गावठी हातभट्टी दारू भरलेली असल्याचे दिसून आले. याप्रकरणी रामकिशन झनकराम धुर्वे (३५, रा. तरोडा, ता. मोर्शी) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
विशेष म्हणजे आरोपी रामकिशन धुर्वे याच्याच तरोडा गावातील दोन गृहस्थांचा मध्यप्रदेशातील हातभट्टीची दारू पिऊन मृत्यू झाला होता. तरोडा धानोरा येथील विषारी दारू सेवन केल्याने मयाराम कुंजीलाल धुर्वे, जगलू फत्तेसिंग टेकाम हे आपल्या राहत्या घरी मृत्युमुखी पडले होते, तर सिताराम शेषराव परतेती व एक महिला दारू पिल्याने अत्यवस्थ झाली होती. जुलै २०२३ मध्ये ती घटना घडली होती. स्टेट एक्साइजच्या कारवाईनंतर तरोडा येथे मध्यप्रदेशातून येणारी हातभट्टीच्या दारूची खेप थांबलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यावर निरंतर कारवाईची गरज आहे.
खोमईतून दुचाकीवर आणली दोन ट्यूब दारू धामणगाव गढी ते धारणी रोडवर वड़झर धरणाजवळ एमएच २७/ ७१५४ या दुचाकीच्या मागील सीटवर एका नॉयलानच्या पोत्यात दोरीच्या साहाय्याने बांधलेला ६० लिटर क्षमतेची एक रबरी ट्यूब व ३० लीटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमधील अंदाजे १२० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. त्याप्रकरणी, दुचाकी चालक आकाश गणेश उईके (२८, रा. गौलान मोहल्ला, खोमई, ता. भैंसदेही, जि. बैतूल) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ व अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







