
गुरुकुंज मोझरी जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे आणि ग्रामगीतेतून देशात एकता निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत ‘बटेंगे तो कटेंगे’सारख्या विषारी घोषणा देणाऱ्या आदित्यनाथ योगींच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही. योगींची भूमिका म्हणजे ‘मुहँ मे राम, बगल में छुरी’ अशीच असल्याचा पलटवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. अमरावती जिल्ह्यातील गुरूदेवनगर गुरुकुंज मोझरी येथे शनिवारी अॅड. यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महासचिव मोहन प्रकाश, खा. बळवंत वानखडे, माजी खा. अनंत गुढे, तिवसा येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड. यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख (अमरावती), प्रा. वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), डॉ. हेमंत चिमोटे (मेळघाट), बबलू देशमुख (अचलपूर), गिरीश कराळे (मोर्शी),सुनील खराटे (बडनेरा), गजानन लेवटे(दर्यापूर) यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.खा. खरगे पुढे म्हणाले, राष्ट्र एकसंघ राहण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे मोठे बलिदान आहे. आरएसएस, भाजपने स्वातंत्र्यासाठी काय केले, असा प्रश्न करत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आम्ही संविधानावर चालणारी माणसं आहोत, मात्र विरोधकांची भाषा संविधान तोडणारी मनुस्मृतीची भाषा आहे. जुमलेबाज मोदी सरकारने ना पंधरा लाख दिले, ना वर्षाला दोन कोटी नोकऱ्या दिल्या, ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. याउलट शेतमालाचे भाव कमी झाले, बेरोजगारी वाढली, देशात अराजकता निर्माण केली. काँग्रेसने संविधान वाचवून लोकशाही जिवंत ठेवल्यामुळे आज मोदी प्रधानमंत्री झाले, असे सांगून खरगे यांनी संविधान वाचविण्याची गरज असल्याचे नमूद केले.
‘यशोमती शेरनी है, डरती नहीं’ काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या चवथ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांनी मतदार संघात विविध योजना आणून सर्वच क्षेत्राचा विकास केला. त्या अतिशय योग्य उमेदवार असून यापुढेही त्या तुमच्या सेवेत राहून उत्तम काम करतील. तुमचा आशीर्वाद देऊन व तुमच्या मतांचा योग्य वापर करून त्यांना निवडून द्या. यशोमती ठाकूर या नुसत्या उमेदवार नाहीत तर त्यांचे काँग्रेस पक्षासाठीही मोठे योगदान आहे. त्यांचे कामच त्यांचा धर्म आहे, लढाऊ महिला म्हणून त्या सर्वश्रुत असताना ये शेरनी है किसिसे डरती नही असे म्हणत यशोमती ठाकूर यांचे खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी भरभरून कौतुक केले.
महायुती सरकारने जनतेची फसवणूक केली : यशोमती ठाकूर विद्यमान राज्यसरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे केवळ मतांसाठी शासनाच्या तिजोरीचा वापर करत असून फसव्या योजना राबवित आहेत. महिला असुरक्षित असून युवक बेरोजगार झालेत, शेतीमालाला भाव न देता त्यांचीही फसवणूक केली. शेतकयांच्या वाढत्या आत्महत्या चितनाचा विषय आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. खोटे आमिषे दाखवून युवकांना फसविण्याचे प्रकार हे सरकार करत आहे, अशी टीका करून यशोमती ठाकूर यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्व समस्यांवर निघेल असे उपस्थितांना आश्वासन दिले.
नेत्यांनी मर्यादा जपावी काल, परवा येथील एका मुलीने खासदाराला चपराशी संबोधले. यावरून त्यांच्या संस्काराची प्रचिती येते. बळवंत वानखडे यांना संविधानाने खासदार बनविले. बळवंत वानखडे हे जनतेचे, देशाचे, महापुरुषांचे शिपाई आहेत. उलट असे वक्तव्य करणाऱ्यांनी स्वतः अवलोकन करावे असे बोलल्यानेच आपण एकदा जेलवारी सुद्धा केलेली आहे, त्यामुळे आपण भाषेचा योग्य वापर करावा व बोलताना, काम करताना आपली मर्यादा जपावी असा इशारा देत मल्लिकार्जुन खरगे यांनी नवनीत राणा यांना मयदित राहण्याचा सल्ला दिला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







