
अमरावती : जगदीश गुप्ता यांना भाजपनेच मोठे केले. नाव, पद, प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र जेव्हा पक्ष प्रतिकूल परिस्थिती होता, तेव्हा याच गुप्तांनी अमरावती शहरातून ‘कमळ’ संपविण्याचे कटकारस्थान रचले. आता अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार नसल्याने भाजपाशी आणि हिंदुत्वाशी कधीचे नाते तोडलेल्या जगदीश गुप्ता यांना भाजपाविषयी प्रेमाचा उमाळा दाटून आला आहे. मात्र जगदीश गुप्ता यांचीही ही खेळ काँग्रेस उमेदवारासाठी पोषक ठरणारी आहे, असे आक्रमक होत भाजप पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून पक्षाची भूमिका मांडली. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे महायुतीच्याच पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही देण्यात आली.अमरावती शहरात भाजपाला संपवण्यासाठी जगदीश गुप्ता यांनी दोन दशके कंबर कसली. जुन्या जाणत्या मतदारांना जगदीश गुप्ता यांच्या पक्षविरोधी कारवाया ठाऊक आहेत. म्हणूनच २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत अमरावतीकरांनी त्यांना सपाटून पराभूत केले. नवमतदारांना गुप्ताजींच्या पक्ष विरोधी कारवाया माहीत नाहीत. म्हणून या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्ट केले. परवा जगदीश गुप्ता यांचे भाजपातून निष्कासन केल्यानंतर ते आपल्या निवडक समर्थकांना घेऊन भाजपा कार्यालयावर आले. भाजपा कार्यालयावर त्यांचे दणदणीत स्वागत झाल्याचे फोटो त्यांनी व्हायरल केले. हे कृत्य पातळी सोडूनच नव्हे तर घृणास्पददेखील आहे, अशी टीकाही भाजपने केली.
२००९ साली जगदीश गुप्ता भाजपाचे विधान परिषद सदस्य असताना त्यांनी खुलेआम काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांचा खुला प्रचार केला.
या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ. प्रदीप शिंगोरे यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती. दरम्यान जगदीश गुप्ता यांच्या सततच्या पक्षविरोधी कारवायांना त्रस्त होऊन भाजपाने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निष्कासित केले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती असताना अनंत गुढे यांचा निवडणूक प्रचार न करता गुप्ता यांनी अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांचा प्रचार करून पक्षविरोधी कार्य केले होते, याबाबतची आठवण यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी करुन दिली.
पत्रपरिषदेला शिवराय कुळकर्णी यांच्यासह किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, दिनेश सूर्यवंशी, चेतन पवार, अॅड. प्रशांत देशपांडे, सतीश करेसिया संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, विवेक कलोती, प्रणीत सोनी आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कायम अपशब्द काढले जगदीश गुप्ता आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला. अतिशय उर्मट वर्तन केले. नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कायम अपशब्द काढले. दोनदा विधानसभेची आमदारकी आणि दोनदा विधान परिषदेची आमदारकी, मंत्रिपद ज्या भाजपाने दिले, त्या भाजपाला अमरावती शहरातून संपवताना जगदीश गुप्तांचे भाजपा प्रेम कुठे गेले होते? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
भाजपा कार्यालयाला गुप्तांनी कुलूप लावले, ताबा घेतला होता जगदीश गुप्ता यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले, तेव्हा त्यांनी राजापेठ स्थित भाजपा कार्यालयाला कुलूप लावले होते. भाजपाचे कार्यालय हे आपले कार्यालय आहे, असे सांगून त्यावर ताबा घेतला होता. त्यावेळी आज भाजपाचे काम करणारे जे नेते या पत्रपरिषदेतून बसले आहेत त्यांनी व भाजपाच्या सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांनी जगदीश गुप्तांचे कुलूप तोडून कार्यालयावर भाजपाचा ताबा मिळवला होता, हे विशेष.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाडले पक्षातून निष्कासित केल्यानंतर जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण नावाचा पक्ष काढून २०१२ साली झालेल्या अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिथे जिथे भाजपाचे अधिकृत उमेदवार होते तिथे तिथे त्यांना पराभूत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. जगदीश गुप्ता यांच्या जनकल्याणला फारसे यश मिळाले नाही. मात्र, भाजपाचे उमेदवार पराभूत करण्यात त्यांना लक्षणीय यश मिळाले, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







