
अमरावती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गस्तीवरील असलेल्या गुन्हे शाखा युनिट एकने मालवीय चौक व श्याम चौकात दोन वाहनांची तपासणी करून तब्बल २ कोटी ६२ लाख १२ हजार १४४ रुपये रोकड जप्त केली. ही कारवाई १३ नोव्हेंबर रोजी दुपारी करण्यात आली.
बुधवारी दुपारी १.१५ वाजता मालवीय चौकात असलेल्या एका चारचाकीत चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेला व्यक्ती रोख मोजत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट एकने त्यातील दोघांची चौकशी केली. चौकशीत आपण रेडिएंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी असून वाहनात व्यापाऱ्यांकडून बँकेत जमा करण्यासाठी घेतलेली १४ लाखांची रोकड असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, प्रत्यक्ष तपासणीत वाहनात ३६ लाख ४० हजार ५१९ रुपये रोकड आढळून आली. त्यामुळे गुन्हे शाखेचे पथक त्या दोघांना वाहनासह सिटी पोलिस कोतवाली ठाण्यात घेऊन जाण्यासाठी निघाले.
त्याचवेळी श्याम चौकात अन्य एक संशयास्पद चारचाकी वाहन दिसून आले. ते वाहन अडवून त्या वाहनातील देखील चौघांची चौकशी केली. त्यांनीसुद्धा आपण रेडिएंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी असून बँकेत भरण्यासाठी २ कोटी १५ लाखांची रोकड घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत वाहनात २ कोटी २५ लाख ७१ हजार ६२५ रुपये रोकड आढळून आली. त्यानुसार ती रोकड व वाहने जप्त करून कोतवाली ठाण्यात जमा करण्यात आली.
सीपींकडून सक्त निर्देश पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव व विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे व योगेश इंगळे, अंमलदार फिरोज खान, सतीश देशमुख, सय्यद नजीमोद्दीन, विकास गुडधे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, अलीम, किशोर खेंगरे, रोशन माहोरे यांनी केली.
कोतवाली हद्दीत ४.५८ लाख रुपये रोख जप्तअमरावती: गुन्हे शाखेच्या स्पेशल स्कॉडने बुधवारी दुपारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतून संशयिताकडून ४ लाख ५८ हजार ५०० रुपये रोख रक्कम जप्त केली. जिया उल्ला खान समीर उल्ला खान (वय ४४ वर्ष रा. ताज नगर, अमरावती) असे संशयिताचे नाव आहे. स्पेशल स्कॉडचे प्रभारी पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले हे पेट्रोलिंग करीत असताना दुपारी १२ च्या सुमारास एकजण राजकमल चौक येथे रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याआधारे त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळील एका कापडी पिशवीमध्ये रोख रक्कम दिसून आली. ती रक्कम कारखान्याची असून त्या रकमेची कोणतीही पावती नसल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली. तथा कोतवाली ठाण्यात जमा करण्यात आली. एसीपी शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनात स्पेशल स्कॉडप्रमुख पीआय आसाराम चोरमले, अंमलदार छोटेलाल यादव, इशय खांडे, आशिष डवले, रंजित गावंडे, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे,
गजानन सातंगे यांनी ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







