
अमरावती मर्डर करण्याची धमकी देत एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यातून तिला आठ आठवड्यांची गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना वरूड तालुक्यात उघड झाली. याप्रकरणी बेनोडा पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून संशयित प्रतीक विलास काकडे (२३, रा. नांदगाव, ता. वरूड) याच्याविरूध्द बलात्कार व पोक्सोन्वये गुन्हा दाखल केला.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला आरोपी प्रतीक याने १५ वर्षीय पीडितेला घरी बोलावले. शारीरिक संबंध ठेव, अन्यथा मी तुझा खून करेन, अशी गर्भित धमकी दिली. आरोपीने धमकीच्या पुढे जाऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. दरम्यान, ती आजारी पडली असता तिला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तिची तपासणी केली असता, ती आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे निदान करण्यात आले. ही माहिती बेनोडा व गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, गाडगेनगर पोलिसांनी जिल्हा स्त्री रुग्णालय गाठून तिच्या पालकांसमक्ष तिचे बयान नोंदविले. त्यानंतर अतिप्रसंगाचा प्रकार उघड झाला. दरम्यान, घटनास्थळ बेनोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तो गुन्हा गाडगेनगरमधून बेनोडा येथे वर्ग करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







