
अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे। अपक्ष उमेदवार तुषार भारतीय यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नेमुन दिलेल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी बाइक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक, महिला व नवमतदार या रॅलीत सहभागी झाल्याने ती चांगलीच लक्षवेधी ठरली. रॅलीच्या अग्रभागी खुल्या वाहनावर स्वार होत त्यांनी मतदारांना अभिवादन करीत सहकार्याचे आवाहन केले.राजापेठ येथून सकाळी ९ वाजता बाइक रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला. मतदारसंघातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी रॅलीतून प्रयत्न करण्यात आला. ही रॅली कल्याणनगर, मोतीनगर, प्रशांतनगर उद्यान, फ्रेजरपुरा, दस्तूरनगर, फरशी स्टॉप, हरिगंगा ऑइल मिल, संताजी कॉलनी, नवाथे अंडरपास होत बडनेरा मार्ग, समर्थ हायस्कूल, रवीनगर, साईनगर, लहानुजीनगर, अकोली, बेनाम चौक बडनेरा उपनगरातील जुनी व नवी वस्ती या भागात रॅली दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पण करून रॅलीचा समारोप झाला. मतदारसंघातील ग्रामीण भाग असलेल्या आसरा व भातकुली येथेही पदयात्रा झाली. या भागातील पांदण रस्त्यांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे वचन तुषार भारतीय यांनी मतदारांसोबत पदयात्रेतून संवाद साधताना दिले. तत्पूर्वी, अंजनगाव बारी येथे रविवारी सायंकाळी प्रचारसभा झाली. या सभेस संबोधित करताना तुषार भारतीय यांनी पंधरा वर्षांत न झालेल्या विकासावर व विकासाच्या अनुशेषावर प्रकाश टाकत परिवर्तनाचे आवाहन केले. पद नसताना अंजनगाव येथे अभ्यासिका, रस्ते, नाल्या, सभागृह यासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा व ती कामे प्रगतीवर असल्याचे विशेषत्वाने उल्लेख केला. दरम्यान, नंदलाल खत्री, अनिल तरडेजा, ऋषी खत्री, विनोद भोजवानी, प्रसन्न मोहोड, आनंद जोशी यांनीदेखील सहभागी नोंदविला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







