
अमरावती : गत १५ दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी सायंकाळी ६ वाजता थांबला. बुधवारी (दि. २०) मतदान होणार आहे, तर मंगळवारी उमेदवारांनी मतदारांशी बंदद्धार गुफ्तगू आणि विजयाची रणनीती आखली आहे. आजची रात्र ही ‘कत्ल की रात’ ठरणारी आहे. असे असले तरी सर्वच उमेदवारांचे ‘हार्ट बीट’ वाढले असून, आज मतदारांचा कौल कुणाला? हे २३ नोव्हेंबर रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघासाठी एकूण १६० उमेदवार निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार मैदानात शड्डू ठोकून आहेत. अमरावती, बडनेरा, तिवसा, अचलपूर, मेळघाट, धामणगाव रेल्वे, दर्यापूर आणि मोर्शी या आठही मतदारसंघात काट्याची लढत आहे.
आजमितीला कोण विजयी होणार याचा अंदाज बांधता येणे कठीण आहे. – काही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे, तर काही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मतदारांचा कौल कुणाला, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणारे आहे. अॅड. यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, रवी राणा, बच्चू कडू, प्रताप अडसड, राजकुमार पटेल आणि देवेंद्र भुयार मैदानात आहेत, तर डॉ.सुनील देशमुख, जगदीश गुप्ता, केवलराम काळे, वीरेंद्र जगताप, कॅप्टन अभिजित अडसूळ, रमेश बुंदिले हे माजी आमदार नशिब आजमावत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे हेदेखील शर्यतीत आहे. विक्रम ठाकरे, गिरीश कराळे, प्रवीण तायडे हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, उद्धव सेनेच्या बंडखोर प्रिती बंडदेखील मैदानात आहेत. एकंदरीत आठ जागांसाठी १६० उमेदवार रिंगणात असून, नवा आमदार कोण? हे २३ नोव्हेंबर रोजी कळेल, हे विशेष.
मतदानाचा टक्का वाढीसाठी महानगरपालिकेत हेल्पलाइन सुविधा
अमरावती : बुधवारी होऊ घातलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिकोणातून स्वीप योजनेंतर्गत नावीण्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील अमरावती आणि बडनेरा विधानसभा परिक्षेत्रातील सर्व मतदारांकरिता सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हेल्पलाइन क्र.०७२१-२५६६०२२ हा दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिकेमार्फत या हेल्पलाइन क्रमांकावर विविध सुविधांचा लाभ घेता येईल. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या निर्देशानुसार अमरावती आणि बडनेरा विधानसभा परिक्षेत्रात व्होटर इन्फर्मेशन स्लीप बीएलओमार्फत सर्व मतदारांपर्यंत वाटप करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील ज्या मतदारांपर्यंत अद्यापपर्यंत व्होटर स्लीप पोहोचल्या नाहीत, अशा सर्व मतदारांनी महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेला हेल्पलाइनशी संपर्क साधून परिपूर्ण माहिती घ्यावी.
ही माहिती मिळेल हेल्पलाइनवर
• मतदारांना मतदान केंद्राचे
पूर्ण नावाबाबत माहिती मतदानाच्या दिवशीचा खोली क्रमांक
• मतदारांचा मतदार
क्रमांकाबाबत माहिती
• मतदाराचा यादी भाग
क्रमांकाबाबत माहिती
अशी संपूर्ण माहिती.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







