
अमरावती : विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत असून, शहर आयुक्तालय हद्दीतील ७९१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीमध्ये चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश येतो. यात धामणगाव मतदारसंघासाठी पाच, बडनेरासाठी ३४४ मतदान केंद्रे, अमरावती विधानसभेसाठी ३४५, तर तिवसा विधानसभा निवडणुकीसाठी ९७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. १८ नोव्हेंबरच्या रात्रीपासूनच सीपी नवीनचंद्र रेड्डी ऑन रोड आले आहेत. निवडणूक बंदोबस्ताकरिता शहरात १,७२४ पोलिस अधिकारी व अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच बाहेरून सीआरपीएफ, एसएपी, एसआरपीएफ, बीएसएफ कंपन्या व मध्य प्रदेश येथून ५०० व अमरावती येथून १०० होमगार्ड प्राप्त झाले आहेत. या कंपन्यांचा स्ट्रॉग रूम, ईव्हीएम सुरक्षा, संवेदनशील परिसर पेट्रोलिंगसाठी, तर ठाण्यातील आरसीपी व क्यूआरटी पथकाचाही निवडणूक बंदोबस्तात वापर करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने सर्व पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात गस्त पथके वाढविण्यात आली. यादरम्यान, रात्री ११:०० वाजल्यानंतर कोणीही जमाव करू नये तसेच विनाकारण फिरू नये, त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापना वेळेवर बंद कराव्यात, असे आवाहन सीपींनी केले. शहरात ड्रोन पेट्रोलिंग केली जात आहे.
...अशी राहील मद्यविक्रीस बंदी
निवडणूक कालावधीत १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६:०० ते २० नोव्हेंबर मतदानाचा संपूर्ण दिवस तसेच २३ नोव्हेंबर या मतमोजणीच्या दिवशी अमरावती आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्व प्रकारची मद्यविक्री करण्यास बंदी करण्यात आली आहे. यादरम्यान, अवैध व्यवसाय व दारू विक्री करणायांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







