
धामणगाव रेल्वे/चांदूर रेल्वे : धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रामधील ३ लाख १७ हजार २८१ मतदार २० नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तब्बल १८ हजार नवमतदारांच्या बोटाला पहिल्यांदाच शाई लागणार आहे.
धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यांतील ३७८ मतदान केंद्रांचा ताबा १ हजार ७८६ कर्मचाऱ्यांनी घेतला. मतदान प्रक्रियेला लागणारे सर्व साहित्य घेऊन हे कर्मचारी मंगळवारी दुपारी शासकीय वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचले. बुधवारी सकाळी ७ पूर्वी उमेदवारांच्या मतदान प्रतिनिधींसमोर अभिरूप मतदान प्रक्रिया करून दाखविल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदानाला सुरुवात होईल. १ लाख ६० हजार १९१ पुरुष व १ लाख ५६ हजार ७०८ महिला मतदार २४ पैकी पसंतीच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत.
संवेदनशील केंद्रावर अधिक बंदोबस्त आतापर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चिंचपूर येथील मतदान केंद्र- ६१ येथे ७९.४१ टक्के व पिंपळखुटा येथील मतदान केंद्र-२१ येथे ७४.१७ अशा टक्केवारीची मते एकाच उमेदवाराच्या पारड्यात गेली. त्यामुळे या दोन्ही केंद्रांवर निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील केंद्रांवर अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहे.
७०० पोलिस कर्मचारी तिन्ही तालुक्यांतील ३७८ मतदान केंद्रांवर ७०० पोलिस कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत. राज्य राखीव पोलिस दलाची विशेष तुकडी तैनात राहणार आहे. इतर जिल्ह्यांतील पोलिस कर्मचारी व संवेदनशील केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी व सशस्त्र दल, आरपीएफच्या ताफ्यासोबतच नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, लोणी टाकळी, दत्तापूर, कुन्हा, तळेगाव दशाासर, मंगरूळ दस्तगीर ठाण्यातील अधिकारी दक्षता घेणार असल्याचे एसडीपीओ अनिल पवार म्हणाले.
पारदर्शक राहणार निवडणूक प्रक्रिया धामणगाव विधानसभा मतदारसंघातील ३७८ मतदान केंद्रे अपडेट करण्यात आली आहेत. या केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी केंद्रावर पोहचले. झोनल अधिकाऱ्याचे विशेष लक्ष मतदान केंद्राकडे राहणार आहे. निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे पार पडणार आहे.
– तेजश्री कोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, धामणगाव विधानसभा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







