
अमरावती : ‘गर्दन काट देंगे’ची धमकी प्रत्यक्षात उतरवून एका तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणाला प्रेमसंबंधांची किनार असल्याचे स्पष्ट झाले असून, तीनही मारेकऱ्यांना अटक करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले आहे. २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० ते १० च्या सुमारास ती हत्या घडली होती.
जुना बायपासस्थित एका मंगल कार्यालयाजवळील दुकानानजीक घडलेल्या त्या खूनप्रकरणी राजापेठ पोलिसांनी २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:४२ च्या सुमारास तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. अब्दुल आकिब अब्दुल वहाब (२७, रा. नालसाबपुरा) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख आवेज शेख हनिफ (१८, रा. यास्मिननगर), सै. अबुजर सै. सलीम (१९, रा. हबीबनगर) व दनियाल अहमद रफिक अहमद (१८, रा. सैफिया स्कूलजवळ, खरय्यानगर) यांचा समावेश आहे. तिघांनीही अ.आकिबच्या खुनाची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन चाकू जप्त करण्यात आले. त्यांना शनिवारी स्थानिक न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी या प्रकरणात मृत आकिबच्या आईच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अर्शद अब्दुल हनिफ (२५), आसिफ खान (५०) व अन्य एक अशा तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. त्यांना अटक झालेली नाही, मात्र प्रत्यक्षात खून करून पसार झालेल्या तिघांना १२ तासांच्या आत अटक करण्यात राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांना यश मिळाले.
अशी आहे बँक स्टोरी
आकिबचे एका मुलीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी आकिबचे वडील त्या मुलीच्या घरी गेले. बोलणीअंती मुलीकडील मंडळींनी लग्नाकरिता मान्यता दिली. दरम्यान आकिबच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलीने व तिच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला. त्यामुळे त्याने मुलीसोबत बोलणे सोडले. दोन महिन्यांपूर्वी त्या मुलीचा साखरपुडा झाला. नंतर मुलीच्या आईने आकिबच्या आईला फोनकरून मुलीचे लग्न तुटल्याचे सांगितले. तुझ्या मुलामुळे तो संबंध तुटला असेल, तर त्याला ‘काट डालेंगे’ अशी फोनवर धमकी दिली.
अशी घडली घटना दोन दिवसांआधी अर्शद व आसिफ खान हे दोघे आकिबच्या घरी आले व त्याला ‘हम तेरी गर्दन काट देंगे’ अशी धमकी दिली. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ती मुलगी व तिची आई या अ. आकिबच्या घरी आल्या. त्याच्या आईसमोर त्यांनी तू माझा लग्नसंबंध तोडला नसेल, तर माझ्यासोबत चल अन् साखरपुड्याबाबत सर्व गोष्टी क्लिअर कर, असे म्हणत त्या दोघी अ. आकिबला घेऊन गेल्या. रात्री १० च्या सुमारास साखरपुडा तोडल्याच्या कारणावरून आरोपींनी आपल्या मुलाचा चाकू मारून खून केल्याचे आपल्याला समजले, असे आकिबच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







