
दर्यापूर : शहरात एकाच दिवशी चार अंत्ययात्रा निघाल्याने दर्यापूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी दर्यापूर ते अकोला महामार्गावर झालेल्या दोन वाहनांच्या समोरासमोरील धडकेत तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या चारही जणांवर मंगळवारी मनीषा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातातील तीनही युवक हे आपल्या कुटुंबातील प्रमुख असल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दर्यापूर-अकोला महामार्गावर दोन वाहनांच्या समोरासमोर धडक झाल्याने एकाच गावातील तीन युवा मित्रांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले होते. मृत तीनही युवकांना वडील नसून, तेच घरातील कर्ते म्हणून कुटुंबाचा गाडा ओढत होते. यामध्ये प्रतीक बोचे यांच्या पश्चात आई, पत्नी व एक वर्षाची चिमुकली आहे. सोबतचा सहकारी मित्र आनंद ऊर्फ गोलू बाहकार हासुद्धा घरचा कुटुंब प्रमुख होता. मूळ अकोला जिल्ह्यातील कानशिवनी या गावातील रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून तो दर्यापूर येथील त्यांच्या मामाकडे राहत होता. त्याच्या पश्चातही आई आणि एक लहान बहीण आहे, तर तिसरा सहकारी विनीत बिजवे यांच्या पश्चात आई व तीन बहिणी असा आप्त परिवार आहे. विनीतसुद्धा कंत्राटी पद्धतीने आपला उदरनिर्वाह भागवीत होता. तीनही युवक हे घरचे कर्ते असल्याने सोमवारी दिवसभर त्यांचा अपघात हा चर्चेचा विषय बनला होता. या तिघांच्याही पार्थिवांना मनीषा मोक्षधाम येथे अग्नी देण्यात आला. शहरातील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचेदेखील हृदयविकाराने सोमवारी निधन झाल्याने त्यांच्या पार्थिवावरही मनीषा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







