
अमरावती : मेळघाट या आदिवासीबहुल क्षेत्रातील धारणी व चिखलदरा या तालुक्यांतील रस्त्यांच्या कामांकरिता २२ कोटी २० लाखांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये ग्रामीण, जिल्हा व इतर जिल्हा मार्ग आदी ६६ रस्त्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या या कामांना आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून गती आली आहे. सदर कामांचा प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बांधकाम विभागाने सादर केला आहे. या प्रस्तावावर सीईओंकडे शिक्कामोर्तब केल्यानंतर रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया राबविल्या जाणार आहेत. यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ‘मार्च एंड ‘नंतर लोकसभा आणि पाच महिन्यांतच पुन्हा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. परिणामी, विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे या वर्षातील कोट्यवधीचे नियोजन, प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रिया रखडली होती. अशातच आता विधानसभा निवडणुका आटोपून दोन आठवड्यांचा कालावधी लोटून गेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील रखडलेल्या कामांना आता गती मिळाली आहे. ग्रामीण रस्त्यांची २१ कामे मंजूर असून, याकरिता ७ कोटी ४७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच याच शीर्षात १० कामांकरिता १ कोटी ९४ लाख, इतर जिल्हा मार्गाकरिता ४ कामे २ कोटी ६१ लाखांचे नियोजन, जिल्हा मार्गाकरिता १७ कामे ९ कोटी ८१ लाख, तसेच अचलपूर आणि वरूडकरिता म्हाडा मिनी म्हाडा शीर्षात ९८ लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. अशा एकूण ६६ कामांकरिता २२ कोटी २० लाखांचा आराखडा तयार करण्यात आला असून, या कामांना प्रशासकीय मंजुरीकरिता सीईओंकडे प्रस्ताव सादर केलेला आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







