
अमरावती : महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या नियंत्रणात बेलोरा विमानतळाची विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. विमानांचे ‘टेक ऑफ’ साठी अडसर ठरणारे वन्यप्राणी बाहेर काढण्याची मोहीमही अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत सुमारे २५० पेक्षा जास्त वन्यप्राणी रेस्क्यू करून ते अभयारण्यात पाठविले आहे. आता केवळ चार ते पाच नीलगायी उरल्या असून त्यादेखील याच आठवड्यात जेरबंद केल्या जातील, असे संकेत आहेत.
बेलोरा विमानतळाचा परिसर २५० हेक्टर एवढा आहे. २००८ पासून बेलोरा विमानतळ विकासकामांचे भिजतधोंडगे होते. अखेर माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून बेलोरा विमानतळाची विकासकामे पूर्ण करून विमाने सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून ‘टाइम बॉण्ड’ ठरवून घेतला. त्यानुसार अलीकडे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणच्या अधिपत्याखाली बेलोरा विमानतळावर अद्ययावत १८५० मीटर धावपट्टी, पथदिवे सुविधा, एटीसी टॉवर, प्रकाश व्यवस्था, टर्मिनल बिल्डिंग, देखणा दर्शनी भाग, अंतर्गत व बाह्य रस्ते, संरक्षण भिंत, ये-जा करण्याची सुविधा, वाहनतळ यासह प्रवाशांशी निगडित बाबी पूर्णत्वास आल्या. मात्र, बेलोरा विमानतळाच्या संरक्षण भिंतीची कामे प्रारंभ होण्याअगोदर आतमध्ये असलेले वन्यप्राणी बाहेर काढण्यात आले नव्हते. त्यामुळे विमानतळावरील कामे पूर्ण झाल्यानंतरही आतील भागात मोठ्या संख्येने हरिण, भेडकी नीलगाय,रानडुक्कर, मोर आदी वन्यप्राणी अस्तित्व राखून होते.
वन्यप्राणी रनवेवर आल्यास विमानांच्या अपघातासाठी कारणीभूत ठरू शकतात. परिणामी, गत महिनाभरापासून वनविभागाने ‘बोमा प्रणाली’द्वारे विमानतळाच्या आतील भागातून वन्यप्राणी रेस्क्यूची मोहीम आरंभली होती. दोन दिवसांपूर्वी २५० पेक्षा जास्त वन्यप्राणी रेस्क्यू करून ते अभयारण्यात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. आता केवळ चार ते पाच नीलगाई जेरबंद करण्याचे बाकी असून त्यासुद्धा याच आठवड्यात पूर्णत्वास जाण्याचे संकेत आहेत.
विमानतळाहून वन्यप्राणी रेस्क्यू करण्यासाठी राज्य शासनाने वन विभागाला ५५ लाखांचा निधी दिल्याची माहिती आहे. नवीन वर्षात जानेवारीमध्ये बेलोरा विमानतळाहून विमानांची ‘टेक ऑफ’ सुरू होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, विमानतळाहून वनकर्मचाऱ्यांचे कर्तव्य तूर्तास थांबविले आहे.
बेलोरा विमानतळावर विमानांच्या ‘टेक ऑफ’ साठी अडथळा ठरणारे वन्यप्राणी बाहेर काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ ४ ते ५ नीलगायी आतमध्ये असल्याची माहिती आहे. त्यामुळे वन्यप्राणी पकडण्यासाठी ‘बोमा प्रणाली यशस्वी ठरली असे दिसून येते.
गौरव उपशाम, प्रभारी प्रबंधक, बेलोरा विमानतळ
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







