
परतवाडा : परतवाडा-धारणी-इंदूर आंतरराज्य महामार्गावर मंगळवारी दुपारी १२ वाजता विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव दुचाकी धडकल्या. या अपघातात दोन्ही चालकांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. अॅम्ब्युलन्स बोलावून मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी बघ्यांची गर्दी रस्त्यावर होती. गजानन तुकाराम शनवारे (३५, रा. घाटलाडकी, ता. चांदूर बाजार) व अजय रामलाल जामुनकर (३०, रा. भुलोरी) अशी मृतांची नावे आहेत. कौशल्या रामुजी येवले (५५, रा. लोणाझरी मसोंडी) या गंभीर जखमी झाल्या. गजानन शनवारे हे सासू कौसल्या येवले यांना एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराकरिता मसोंडी येथे एमएच २७ बीए ७८३९ क्रमांकाच्या दुचाकीने घेऊन जात होत्या. विरुद्ध दिशेने अजय जामुनकर हा एमएच २७ डीएफ ०१३६ क्रमांकाच्या दुचाकीने परतवाडाकडे येत होता. दोन्ही दुचाकी भरधाव वेगाने एकमेकांवर आदळल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी महिलेला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. दुधाचा व्यवसाय करणारे गजानन शनवारे यांना तीन मुले आहेत, तर शेती व मजुरी करणाऱ्या अजय जामूनकर याला ३० सप्टेंबर रोजी मुलगा झाला. दोन्ही कुटुंबांनी कर्ती व्यक्ती गमावली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







