
अमरावती : एक महिन्यावर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीला आणि धोकादायक नायलॉन मांजाच्या वापरास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच पोलिसांच्या कारवाईलाही प्रारंभ झाला. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ डिसेंबर रोजी साडेबारा हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश करे यांना प्राप्त गोपनीय माहितीवरून ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:२० वाजता रूपेश जनार्दन दिवाण (४०, रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, योगायोग कॉलनी) याने राहत्या घरात थाटलेल्या जनरल स्टोअर्समधून नायलॉन मांजा, चक्री असा एकूण १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, रूपेशविरुद्ध भारतीय न्याय सांहितेच्या कलम २२३ सहकलम ५ पर्यावरण सरंक्षण कायदा १९८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश करे यांच्यासमवेत उपनिरीक्षक राहुल महाजन, जमादार सुभाष पाटील, नाईक पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत गवई, सचिन बोरकर, शिपाई सागर चव्हाण, जावेद पटेल यांनी कारवाईत सहभाग घेतला.
नायलॉन मांजाविरोधात कारवाईचे आदेश मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी वापर होत असलेल्या चायना/नायलॉन मांजामुळे गळा आवळून, तसेच मानेला कापा पडून प्रसंगी मनुष्य, पक्ष्यांच्या जीवितास थोका निर्माण होतो. पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरणे, विजेच्या तारांवर घर्षणाने आग, वीज उपकरणांमध्ये बिघाड, अपघात असे प्रकार निदर्शनास आले आहेत. यामुळे त्याविरोधात कारवाईचे आदेश शहर पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
नावीन्याच्या आकर्षणातून नायलॉन नैसर्गिक पद्धतीने अर्थात,कापसापासून अथवा वनस्पती, कीटक यापासून तयार केलेल्या धाग्यांचे आयुष्यमान ठरलेले असते. पतंगोत्सवात याच धाग्यांचा वापर पूर्वी होत होता. मात्र, काही तरी नवीन, करण्याच्या नादात पतंग उडविणारे कृत्रिम धाग्यांकडे ओढले गेले. यामध्ये पूर्वीसारखे शिरस, काच यांचा वापर करावा लागत नाही. थेट दुकानातून विकत घेऊन पतंगीला जोडावे लागते. ही सुविधा जीवघेणी ठरत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







