मुख्य महाव्यवस्थापक नाशिक प्रशिक्षण केंद्र- श्री. बनसोडे
सुरक्षा साधनांचा वापर न केल्यास होणार कारवाई
बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वाटप
अमरावती : महावितरणचा तांत्रिक कर्मचारी सुरक्षा साधनांच्या वापराबाबत प्रशिक्षित असूनही तो अपघाताला बळी पडतो हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याकरिता अती आत्मविश्वास बाळगणे आणि त्यापोटी सुरक्षा साधनाचा वापर न करणे यांचा मोठा वाटा असल्याचे निदर्शनास आले आहे.अपघात तांत्रिक कर्मचारी, बाह्य स्रोत कर्मचारी अथवा अन्य कोणाचाही असो त्याची झळ मात्र त्याच्या कुटूंबाला कायमस्वरूपी सोसावी लागते.त्यामुळे महावितरणमध्ये “शून्य अपघात” चळवळ राबवा असे प्रतिपादन श्री. दत्तात्रय बनसोडे ,मुख्य महाव्यवस्थापक प्रशिक्षण व सुरक्षा एकलहरे (नाशिक)यांनी केले.
महावितरण प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र , अमरावती येथे महावितरण तंत्रज्ञ आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांच्यासाठी आयोजित “अपघात व सुरक्षा” या विषयावर आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी,अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, कार्यकारी अभियंता नाशिक राजकुमार पाटील, अनिरूध्द आलेगावकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मुख्य महाव्यवस्थापक म्हणाले की, विज क्षेत्रात काम करतांना सुरक्षा नियमाचे पालन व्हायलाच पाहिजे, आयुष्यापेक्षा मौल्यवान काहीच नसते,त्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांनी “तीन रॉड जिंदगीके (आर्थिंग रॉड)” कायम सोबत ठेवावे आणि त्याचा सदैव वापर करावा. एकुण विद्युत अपघातापैकी ६० टक्के अपघात हे लघुदाब वाहिनीवर होतात. ते टाळण्यासाठी वीज वाहिन्यांच्या मध्ये स्पेसर लावावे,जेणेकरून एखादी वाहिनी तुटली तरी ती जमीनीवर पडणार नाही, एखादे वेळेस भार वाढला तरी शॉर्ट सर्किट होणार नाही, झुकलेले खांब सरळ करावे, वीज वाहिन्यांना आवश्यक त्या ठिकाणी गार्डींग लावावे.
तसेच यापुढे तांत्रिक कामांची आकस्मिक पाहणी करण्यात येणार असून जे कर्मचारी सुरक्षा साधनांचा वापर करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले की, प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी ही महावितरणची संपत्ती आहे आणि विद्युत क्षेत्र हे ऑन ड्युटी २४ तास व चुकीला माफी नसलेले क्षेत्र आहे,हे माहित असतांनाही कर्मचारी सुरक्षा साधनाचा वापर करीत नाही हे दुर्दैवी आहे.
आवश्यक ती सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जातात परंतु त्यांचा योग्य वापर केला जात नाही उदा. सुरक्षा हात मोज्यांचा वापर वाहिनीवर काम करताना करण्याऐवजी पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, ई. साहित्य ठेवण्यासाठी करतात हे अत्यंत खेदजनक आहे. केवळ विद्युत अपघातच नव्हे तर अन्य रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे ज्यामध्ये दररोज मोटर सायकल वरून प्रवास करणारे महावितरण कर्मचारी सामील आहेत. त्यामुळे मोटर सायकल चालवणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हेल्मट सक्तिने वापरावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
महावितरणमध्ये काम करणारे बाह्यस्त्रोत कर्मचारीही महावितरणसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देत असल्याने त्यांनीही सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असे प्रतिपादन अधीक्षक अभियंता श्री. दिपक देवहाते यांनी केले.
यावेळी स्वाभिमान वीज तांत्रिक नागरी सेवा सहकारी संस्थेमार्फत बाह्यस्त्रोत कर्मचारी यांची एक दिवसीय सुरक्षाविषयक कार्यशाळा घेण्यात आली. त्या निमित्ताने मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे आणि मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या हस्ते बाह्यस्त्रोत संस्थेचे प्रमुख पंकज खराटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनांच्या किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप भोयरसह बाह्यस्त्रोत आणि तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता राजेश पाटील यांनी केले, सुत्रसंचालन राजीक यांनी केले,तर आभार राजेश बिजवे यांनी मानले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






