
दर्यापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत ‘वन नेशन वन स्टुडंट’ आयडी बनवण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत दर्यापूर तालुक्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे डिसेंबरपर्यंत एकूण ११ हजार ३२० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती दर्यापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे यांनी दिली.
दर्यापूर तालुक्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत एकूण २२४ शाळा असून, २६ हजार १५४ विद्यार्थी आहेत. पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपार आयडी कार्ड दिले जाणार आहे. त्यासाठी नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे यांनी सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. हे काम ३० नोव्हेंबरपर्यंतच पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, विधानसभा निवडणूक आल्यामुळे काम थांबले होते. अपार आयडी ही विद्यार्थ्यांची नवी ओळख देणारी प्रणाली असून, त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना १२ अंकी क्रमांक असलेले एक कार्ड दिले जाणार आहे. या क्रमांकावर या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असणार आहे. हे नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक व शिक्षक राबत आहेत.
महिनाभरापूर्वीच शासनाकडून, पत्र आले होते. यादरम्यान सर्व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिल्या. अपार आयडीसाठी विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणूक आल्यामुळे अपार आयडी कार्डचे काम बंद होते. मात्र, लवकरच तालुक्यातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्डचे काम पूर्ण होईल.
– संतोष घुगे, प्र. गटशिक्षणाधिकारी,
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






