
मोर्शी : महावितरणच्या मोर्शी उपविभागातील ४२ वीजचोरांवर महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारवाई केली. त्यांच्याविरुद्ध ८ लाख ६८ हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मोर्शी शहरात मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार केली आहे. या माहितीवरून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मीटरची तपासणी करण्यासाठी ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांची १२ विविध पथके तयार केली. या पथकांनी मोर्शी परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जादा वीजवापर आणि कमी बिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. ही वीजचोरी रोखण्यासाठी कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांतकाकडे, उपकार्यकारी अभियंता आशिष सोरडे, हर्षल थोटे यांच्या नेतृत्वात मोहीम राबविण्यात आली.
मोर्शी उपविभाग-१ मध्ये ३० ग्राहकांकडून ७लाख ११ हजार व मोर्शी उपविभाग-२ मधून १२ ग्राहकांकडून १ लाख ५७ हजार अशी एकूण ८ लाख ६८ हजार रुपयांची वीज चोरी पकडली. या वीज चोरट्यानी एकूण ४३ हजार ८६३ युनिटची चोरी केली आहे. २ ग्राहकांनी नियमबाह्य वीज जोडणी घेऊन २५० युनिटची चोरी केली. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com





