
तिवसा : तालुक्यातील शिवणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने तेथेच कार्यरत सहायक शिक्षिकेला गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास मोबाइलवरून अर्वाच्य शिवीगाळ केली. संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे धास्तावलेल्या शिक्षिकेने शुक्रवारी तिवसा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दिली.
सूत्रांनुसार, १ मे महाराष्ट्रदिनी शिवणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांकडून सुरुवातीला राष्ट्रध्वज उलट फडकविण्यात आला होता. त्याचे चित्रीकरण करून व्हायरल केल्याचा आरोप शिक्षिकेवर करण्यात आला. तोच राग मनात धरून फोनवरून शिक्षिकेला अर्वाच्य शिवीगाळ करून कुटुंबासह जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ते संभाषण शिक्षिकेच्या मोबाइलमध्ये जतन झाले आहे.
याप्रकरणी शिक्षण विभाग काय निर्णय घेणार, कुणावर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सतत गैरहजर, इतर कामेच अधिक?शिवणगाव येथील मुख्याध्यापकाचा अनियमिततपणा व गैरवर्तनाबाबत पालकांच्या नेहमीच तक्रारी असतात. त्यांची बदली करण्यात यावी, अशा आशयाचा ठराव स्थानिक ग्रामपंचायतीने तिवसा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर केला आहे. मुख्याध्यापक हे शाळेत नेहमी गैरहजर राहत असून, प्रॉपर्टी डिलिंगच्या कामातच अधिक व्यस्त असल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवणगाव शाळेत कार्यरत शिक्षिकेची तक्रार प्राप्त झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात येईल.
– अभिषेक कासोदे, गटविकास अधिकारी, तिवसा
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







