
अमरावती : अमरावती वनवृत्ताअंतर्गत बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी मुख्य वनसंरक्षकांकडून प्रसिद्ध झाल्यानंतर वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदली निकषाप्रमाणे वन कर्मचाऱ्यांना अंतर्गत उपविभागात बदली मिळेल का, याकडे नजरा लागल्या आहेत.
अमरावती वनवृत्ताअंतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, मेळघाट प्रादेशिक बुलढाणा या प्रादेशिक वन विभागासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना, गुगामल, परतवाडा, अकोला, तसेच कार्य आयोजना, सामाजिक वनीकरण विभाग, वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा अशा ठिकाणी कार्यरत मुख्य लेखापाल, लेखापाल, वनपाल, सर्वेक्षक या गट क वर्ग संवर्गातील बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुख्य लेखापाल ४, लेखापाल १३, वनपाल संवर्गातील ५४, सर्वेक्षक ७ कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. वनपालामध्ये मेळघाटात २७ कार्यरत असून, सात वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना बिगर अवघड क्षेत्रात बदली करणे क्रमप्राप्त ठरते.
वनपालांची यादी सदोष मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या बदलीपात्र यादीमध्ये घोळ दिसून येत आहे. के. आर. धोत्रे हे चांदूर रेल्वे वर्तुळात कार्यरत असताना धोत्रे यांना चिरोळी वर्तुळात कार्यरत दाखविण्यात आले. अमरावती वनविभागातील रिक्त होणाऱ्या वनपालांच्या पदांवर वडाळी, लखारा, पुसला, तिवसा या चार वर्तुळाकरिता मोठी आर्थिक उलाढाल होण्याची चिन्हे आहेत.
लेखापालांची बदली होणार का?वन विभागातील मुख्यालय ठिकाण असलेल्या शहरी भागातच बदली व्हावी. केवळ टेबल बदलावा अशी काही लेखापाल फिल्डिंग लावली आहे. काहीही झाले तरी शहर सोडायचे नाही, याकरिता वरिष्ठांची मनधरणी केली जात आहे. त्याअनुषंगानेच बदलीपात्र यादी तयार झाल्याचे बोलले जात आहे. लेखापालांनी अगोदर टेबल निश्चित केले. नंतर बदलीचे ठिकाण ठरविले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







