‘सॉफ्टवेअर अपडेशन’मुळे कर संकलनाला ब्रेक !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : महापालिकेने सुमारे १८ टक्के सवलतीसह थकीत कराचा भरणा करण्यास ७ मेपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी २ व ३ मे रोजी ‘सॉफ्टवेअर अपडेशन’ मुळे ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला, महापालिका प्रशासन व संबंधित अभिकर्त्याने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे क्लोझिंग व सन २०२४- २५ चे देयके समाविष्ट करण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. त्यामुळे झोन कार्यालयात देयक स्वीकारले गेले नाही. तद्वतच, महापालिकेच्या संकेतस्थळावर देखील मालमत्ता देयक भरता आले नाही. अनेक मालमत्ताधारक कार्यालयातून परत गेले. झोन ३१ मार्च रोजी सन २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपुष्टात आले. मात्र वसुलीला मर्यादा आल्याने कर भरणा करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. कराचा भरणा करताना कमीतकमी १३ ते १८ टक्के सूट मिळाल्याने मालमत्ताधारकांनी कर भरण्यास व्यापक प्रतिसाद दिला. त्यामुळे पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, २ व ३ मे रोजी सन २०२३-२४ या वर्षांचे क्लोझिंग करणे व चालू आर्थिक वर्षांचे देयके ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र त्याची पूर्वसूचना देण्यात न आल्याने अनेकांनी कर भरण्यासाठी झोन कार्यालयात धाव घेतली. मात्र आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने त्यांची देयके ऑफलाइन स्वीकारण्यात आली नाही. सॉफ्टवेअर अपडेशन पूर्ण झाले की, संपूर्ण ऑनलाइन यंत्रणा पूर्ववत होणार आहे.

७ मेपर्यंत मिळवा सूट सन २०२३-२४-मालमत्ता कर सूट व सवलतीसह भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अमरावतीकर मालमत्ताधारक आपला कर आता ७ मेपर्यंत भरू शकतील. मात्र त्यातील २ व ३ मे रोजी ऑनलाइन कर भरणा बंद असल्याने अडचण झाली. अनेक लोक झोन कार्यालयातून देखील कर न भरता परतली. दरम्यान ४ मेपासून ऑनलाइन यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर मालमत्ताधारकांनी थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

असा झळकतोय संदेश अमरावती मनपाच्या संकेतस्थळावर ‘सन २०२४-२०२५ आर्थिक वर्षाचे संगणकीय समायोजनाचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच कराचे देयके उपलब्ध होत आहे. कृपया प्रतीक्षा करा. फायनान्शियल क्लोझिंग ऑफ फायनान्शियल इअर २०२३-२४ इज प्रोग्रेस, द बिल ऑफ फायनान्शियल इअर २०२४-२५ विल बि अव्हेलेबल अॅट द अर्लियस्ट’ असा संदेश झळकत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेतील मालमत्ता कर प्रणालीचे सॉफ्टवेअर अपडेशन सुरू आहे. त्यामुळे दोन दिवस ऑनलाइन देयके स्वीकारण्यास मर्यादा आल्या होत्या. ३ मे रोजी रात्रीपासून ऑनलाइन यंत्रणा पूर्ववत होईल. – नरेंद्र वानखडे, मूल्यनिर्धारक कर संकलन अधिकारी

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013579
error: Content is protected !!