सावली ग्रुप अमरावती द्वारा आयोजित पुर्नविवाह परिचय मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद
अमरावती (प्रतिनिधी):आयुष्याच्या वळणावर असाही प्रसंग ओढवतो,आपल्या जीवनसाथीचे अकाली निघून जाणे माणसाला दुःख देऊन जाते. परंतु पुढे संपूर्ण आयुष्य पडले असल्याने नवीन जीवनाची सुरुवात करणे सुद्धा महत्वाचे असते. त्यामुळे एकल व्यक्तीच्या जीवनात पुर्नविवाह च्या माध्यामातून त्यांची जीवनवेल पुन्हा फुलविणे हा एक स्त्युत्य उपक्रम आहे. आज काळ बदललेला असल्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलेले काम हीच परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले.
सावली ग्रुप अमरावतीच्या वतीने मराठा, देशमुख, पाटील समाजातील विधवा, विधुर, घटस्फोटित, परित्यक्ता यांच्याकरिता पुनर्विवाह परिचय मेळाव्याचे आयोजन आज दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या समवेत मान्यवर.शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य – हेमंत काळमेघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ माजी कुलसचिव सी.डी. देशमुख, माजी सह-आयुक्त मुंबई समाज कल्याण जी.डी. देशमुख, सावली ग्रुपच्या अध्यक्ष छायाताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की समाजातील ऊर्जावंत व उत्साही व्यक्तींनी पुढे येऊन समाजाला एकत्रित आणण्यासाठी केलेला प्रयत्न हा नक्कीच समाजाला विकासाच्या दिशेने नेणारा आहे. अशा विधायक उपक्रमातूनच समाजात नव्या जाणिवा निर्माण होऊन आवश्यक बदल घडणार असल्याचे सुद्धा आमदार महोदयांनी सांगितले. तत्पूर्वी यावेळी सावली ग्रुप च्या अध्यक्ष छायाताई देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध सामाजिक उपक्रम व कार्याविषयी माहिती दिली. भारतीय संस्कृती मध्ये पुर्नंविवाहाची परंपरा चालत आली आहे. त्यामुळे आजच्या परिस्थिती समाजाला एकत्रित आणून सुसंवाद घडवून आणण्यासाठी व पुर्नविवाहातून सुखी-संसार बहरण्यासाठी या मेळाव्याच्या आयोजनातून एक प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती छायाताई देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आयोजनाची प्रशंसा करीत पूर्वविवाह परिचय मेळावा काळाची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान पुनर्विवाह परिचय मेळाव्याला उपस्थित इच्छूकांनी आपली नाव-नोंदणी करून पुनर्विवाह अनुरूप इत्यंभूत परिचय दिला. यावेळी काहीचा योग सुद्धा जुळून आला. या मेळाव्याला मराठा,देशमुख, पाटील समाजातील पुर्नविवाह इच्छूक उमेदवार, तसेच समाज बांधवांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com