
नेरपिंगळाई : स्थानिक भोजनपुरास्थित वासुदेव वासनकर यांच्या घरात फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत कृषिसाहित्य, दुकानातील साहित्य, रोकड, कागदपत्रे व घरगुती साहित्य खाक झाले. ३ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिस सूत्रांनुसार, वासुदेव वासनकर यांचा एक मुलगा रवींद्र वरच्या माळ्यावर राहतो. शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरातील फ्रीजचे कॉम्प्रेसर फुटले. यामुळे अचानक स्फोट होऊन घराला आग लागली. त्यात घरातील अन्नधान्य, कपडे जळून खाक झाले. अंगावरील कपडे तेवढे शिल्लक राहिले.
रवींद्र वासनकर यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानातील काही जिन्नस त्यांनी राहत्या घरी ठेवल्या होत्या. किराणा दुकानातील दोन किलो काज. दोन कडे तुर दाळ. दोन कदे चणादाळ, तेलाचे डबे यासह आगीत त्यांच्या शेतातून निघालेला जवळपास १३ क्विंटल कापूस, १२ क्विंटल गहू खाक झाला. कूलर, टीव्ही, कपाट, फ्रीज, दोन अॅण्ड्रॉइड मोबाइल जळाले. याशिवाय ६० ग्रॅम सोने, पीककर्जाचे मिळालेले एक लाख रुपये रोख व मुलांची शालेय कागदपत्रे आगीत जळाली. या नुकसानाचा पंचनामा तलाठ्यांनी केला. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील व कोतवाल उपस्थित होते.
आग लागली त्यावेळी रवींद्र हे शेतात गेले होते, तर घरातील महिलादेखील कामानिमित्त बाहेर पडली होती. मुलगासुद्धा बाहेर होता. त्यामुळे घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली. परिसरातील नागरिकांनी अथक प्रयत्न करून एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर मोर्शी येथील नगरपरिषदेचे अग्निशामक वाहन पोहोचले. आग पर्णतः विझविण्यात आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







