अमरावती : अवैध सावकारीच्या संशयावरून सहकार विभागाच्या तीन पथकाने शहरात तीन ठिकाणी धाडसत्र राबविले. दोन ठिकाणी पथक रिकाम्या हाताने परतले असले तरी तिसऱ्या ठिकाणी घबाड मिळाले. यामध्ये स्वाक्षरी केलेले ७९ धनादेशासह अवैध सावकारीसंदर्भात कागदपत्रे आहेत.
अजय राजू बाबर हे परवानाधारक सावकार होते. त्यांचे ऑक्टोबर २०२४ मध्ये निधन झाले. त्यांच्या परवान्यावर अन्य अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार बाबर यांच्याशी संबंधित महिलेने सहकार विभागाकडे केली होती. पडताळणी करून जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात तीन पथकांचे गठण करण्यात आले. यामध्ये सहायक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वातील सहकार अधिकारी सुधीर मानकर व उज्ज्वला मोहोड, राहुल पुरी यांच्या पथकाने मृत सावकाराशी संबंधित व्यक्तीच्या वासनकर ले-आउट येथील निवासस्थानी धाड मारली. यामध्ये मृत परवानाधारक सावकार हयात असणाऱ्या काळातील अवैध सावकारीसंदर्भातील कागदपत्रे पथकाच्या हाती लागली.
अंजनगावचे सहायक निबंधक राजेश भुयार यांच्या नेतृत्वातील मनोज रोननकर, उषा मून व अमोल लोमटे या पथकाने मृत सावकाराचा मदतनिसाच्या आनंदनगरातील निवासस्थानावर धाड टाकली.
अधिकृत परवान्याआड अवैध सावकारी मृत परवानाधारक सावकार अजय बाबर हयात असताना त्या कार्यकाळातील स्वाक्षरी असलेले ७९ धनादेश, ७मुद्रांकासह रकमांच्या नोंदी असलेली नोंदवही शिवाय तब्बल १० वाहनांच्या आरसी यासह अन्य कागदपत्रे पथकाच्या हाती लागले आहे. या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सहकार अधिकारी मानकर यांनी सांगितले.
कारवाई कुणावर? अधिकाऱ्यांसमोर पेच परवानाधारक मृत सावकार अजय बाबर हे महापालिकेशी संबंधित कंत्राटदार होते. त्यांच्या हयातीमधील कागदपत्रांची पडताळणीमध्ये अवैध सावकारीचे व्यवहार असल्याचे स्पष्ट झाल्यास कारवाई कुणावर करणार, हा पेच निर्माण झाला आहे. शिवाय मृताचा परवाना ३१ मार्च २०२५ पर्यंत वैध आहे व यामध्ये वारसाची नोंद नसल्याचे सहकार विभागाने सांगितले.
महाजनपुरा येथील दुकानात धाड एआर प्रीती धामणे यांच्या नेतृत्वातील शिल्पा कोल्हे, नरेंद्र इंगळे व अझरहर खान यांच्या पथकाने मृताचे महाजनपुरा येथील दुकानात थाड मारली. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत जिल्ह्यात अवैध सावकारीसंदर्भात १५ ठिकाणी थाडसत्र राबविले. मोर्शी येथे दोन महिलांवर गुन्हे दाखल केले, तर अन्य प्रकरणे सुनावणी व त्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रियेत आहेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com