अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या काही वर्षामध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांत रुग्णालयात ५६५५ महिलांची प्रसूती झाली. ३४१६ सिझेरियन झाले आहे. याठिकाणी ऑन कॉलवर असलेल्या डॉक्टरांचा सर्वाधिक भर हा सिझेरियन प्रसूतीवर असल्याची आकडेवारी सांगते.
जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरुवातीला याठिकाणी नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण जास्त होते; परंतु गेल्या काही वर्षामध्ये येथील नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण कमी झाले असून, सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ६० ते ६५ टक्के दाखल महिलांचे सिझेरियन होत असल्याचे चित्र आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने येथे डॉक्टर कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार याठिकाणी कंत्राटी पाच डॉक्टर कार्यरत असून, चार डॉक्टर हे ऑनकॉल तर एक डॉक्टर फुलटाइम कार्यरत आहेत.
महिन्याला करतात ८० ते ९० सिझेरियन
ऑनकॉल डॉक्टरांना प्रत्येक सिझेरियनमागे चार हजार रुपये देण्यात येतात. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ऑन कॉल कार्यरत डॉक्टर हे महिन्याला ८० ते ९० सिझेरियन प्रसूती करतात. त्यामुळे एका सिझेरियनमागे ४ हजार याप्रमाणे महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपयांची कमाई हे डॉक्टर करत आहेत. त्यामुळे त्यांचा भर जास्त सिझेरियन प्रसूतीवर असल्याचे बोलले जात आहे.
रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ४ कंत्राटी डॉक्टर कार्यरत आहेत, तर एकच डॉक्टर हे ऑन कॉल सेवा देत आहेत. मागील दहा महिन्यांत रुग्णालयात एकूण ५ हजार ६५५ प्रसूती झाल्या आहेत.
डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com