अलार्म लागला तरीही चोरट्यांचा धुमाकूळ
तिवसा : तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. वर्षभरापूर्वी महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला होता तसेच अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती शहरात पुन्हा घडली असून, बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांकडून तिवसा येथील स्टेट बँकेच्या त्याच एटीएमला लक्ष्य करण्यात आले. सीसीटीव्हीने सुरक्षा रक्षकांची जागा घेतली, अलार्म लागला तरीही चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे.
पूर्वी महत्त्वाच्या शासकीय कार्यालयीन ठिकाणी रात्रपाळीत चौकीदार म्हणजेच सुरक्षा रक्षक असायचे. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यात किंवा घटना घडल्यास पोलिसांना उपयुक्त माहिती मिळण्यास मदत व्हायची. परंतु, तंत्रज्ञानाच्या युगात गेल्या काही वर्षापासून कोणत्याही शासकीय कार्यालयीन ठिकाणी रात्रपाळीत सुरक्षा रक्षक दिसून येत नाही. विशेष म्हणजे, बँकेसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणांवरूनही सुरक्षा रक्षकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. कारण, आता सुरक्षा रक्षकांची जागा सीसीटीव्ही कॅमेऱ्याने घेतली आहे.
आर्थिक नुकसान झाले तरी चालेल,परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुन्हेगारांच्या हालचाली टिपल्याच जातील, हाच प्रत्येकाचा समज आहे. परंतु गुन्हेगारी क्षेत्रातील मातब्बरांनी तांत्रिक तज्ज्ञांचा हा समज आता गैरसमज ठरवला आहे. कॅमेऱ्यावर स्प्रे मारून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या हालचाली टिपण्याची क्षमता नष्ट करण्याची शक्कल शोधून काढली आहे.
विशेष म्हणजे, पूर्वी सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असताना एखादी घटना घडल्यास सुरक्षा रक्षकावर कारवाई व्हायची किंवा त्याला कामावरून काढून टाकले जायचे. परंतु, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काही कारवाई करण्याचा कायदा तूर्तास तरी अस्तित्वात नाही.
पोलिसांचे पेट्रोलिंग बंद काही दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनाकडून मध्यरात्री पेट्रोलिंग करण्यात यायचे. विशेष म्हणजे, तालुक्यातील शासकीय बँकेला भेट देऊन तेथील नोंदवहीत पोलिसांकडून भेटीची नोंद करण्यात यायची. मात्र, सध्या ही पद्धत मोडीत निघाल्याचे दिसून येत आहे.
सीसीटीव्हीवर विसंबून मोठमोठी प्रतिष्ठाने रात्रीला बंद केल्यानंतर त्याची जबाबदारी सीसीटीव्हीवर सोपविण्यात येते. परंतु, आता निव्वळ या कॅमेऱ्यावर अवलंबून राहणे व्यावसायिक तथा वित्तीय संस्थांना महागात पडणार असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
गुरख्याची शिट्टी गायब दशकभरापूर्वी आर्थिक सुबत्ता असलेल्या ग्रामीण भागात रात्रपाळीत गुरखा ग्राम रक्षणाचे काम बजावत होते. अपरात्री त्यांची शिट्टी गुंजायची. परंतु, मोबदला म्हणून नागरिकांकडून अत्यल्प आर्थिक सहाय्य होत असल्याने आज गावखेड्यातून तेही दिसेनासे झालेत.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com