पीएम रिपोर्टमध्ये हेड इंज्युरी : अखेर मृताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
अमरावती : रहाटगाव येथील फार्महाऊसमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला होता. यात अमोल गायकवाड याने मृत्यू पूर्व लिहिलेली चिठ्ठी व शिल्पा गायकवाड हिच्या पीएम रिपोर्टमध्ये हेड इंज्युरी असे मृत्यूचे कारण आल्याने २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता मृत अमोल गायकवाडविरुद्ध पत्नी शिल्पा हिच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक गजानन कवडे यांनी तक्रार नोंदविली.
रहाटगाव रिंग रोडस्थित एका मंगल कार्यालयासमोरील प्रज्वल पाथरे यांच्या फार्म हाऊसमध्ये अमोल व शिल्पा हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले होते. मृत अमोलचे वडील सुरेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांच्याही आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. अमोलने शिल्पाचा गळा आवळून वा डोके भिंतीवर आपटून खून केला असावा, अशी पोलिसांना शंका होती.
अमोलच्या आई-वडिलांचे बयान अमोलच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाइकांचे नोंदविलेले बयान, हेड इंज्युरी असे पीएम रिपोर्टमध्ये शिल्पाच्या मृत्यूचे कारण व मृत अमोलच्या खिशात आढळलेली चिठ्ठी याआधारे मृत अमोलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. अमोलने शिल्पाला मारहाण केली असावी, त्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असे पीएसआय कवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी मृत पतीविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला. दोषारोपपत्र दाखल करताना आरोपी हा मृत असल्याने अबॅटेड समरी मंजूर करावी, अशी विनंती न्यायालयाला केली जाईल.
महेंद्र अंभोरे, ठाणेदार, नांदगाव पेठ

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com