वरूड : बार आणि उपाहारगृहामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी नावापुरतेच असून आरओ वॉटर फिल्टर शोभेची वस्तू बनले आहेत. जलजन्य आजारांच्या धोक्यामुळे ग्राहकांना थेट बाटलीबंद पाणी विकत घेण्याची वेळ येते.
नियमानुसार प्रत्येक बार, उपाहारगृहात जलशुद्धीकरण यंत्र (आरओ वॉटर फिल्टर) लावणे अनिवार्य आहे; परंतु केवळ आर्थिक लोभामुळे जलशुद्धीकरण यंत्र नावापुरतेच लावण्यात आले असून, ते शोभेची वस्तू ठरले आहे. अनेक बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहात बंद विहिरी असल्याने अशुद्ध पाणी ग्राहकांना दिले जाते. परिणामी ग्राहकांना जलजन्य आजारांचा फटका बसतो. पाणी किती शुद्ध आणि किती अशुद्ध, असा प्रश्न उभा ठाकला आहे. बाटलीबंद पाण्याची एक्सपायरी आणि नियमित पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासतो तरी कोण, हा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तालुक्यातील बार आणि उपाहारगृहात शुद्ध पाणी नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते. काही ठिकाणी विहिरींच्या तळाशी सूर्यकिरणे पोहोचत नाहीत. यामुळे ते पाणी कितपत पिण्यायोग्य, हा संशोधनाचा विषय आहे. नाइलाजाने ग्राहकांना २० रुपयांत बाटलीबंद पाणी घेऊन तहान भागवावी लागते. नगरपरिषद किंवा अन्न व औषधी प्रशासनाने पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी ग्राहकांतून होऊ लागली आहे.
उपाहारगृह, रेस्टॉरंटमध्ये आरओ, वॉटर फिल्टर लावणे तसेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. पाण्याचे टाकेसुद्धा दरमहा स्वच्छ करणे गरजेचे असते. याकडे बहुतेक ठिकाणी दुर्लक्ष आहे. अशुद्ध पाण्यामुळे जलजन्य आजाराची दाट शक्यता राहते.
डॉ. प्रमोद पोतदार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वरूड

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com