तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, संचालकावर गुन्हा दाखल
वरूड : तालुक्यातील अमडापूर येथील आरा गिरणीवर वनविभागाच्या पथकाकडून धाडसत्र राबविण्यात आले. या धाडसत्रात तीन लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरा गिरणीचा संचालक मुसा खाँ जब्बार खाँ पठाण (वय ५१, रा. वरूड) यांच्याविरुद्ध प्रथम वन गुन्हा (पीओआर) दाखल करण्यात आला आहे.
अमडापूर येथील मुसा खाँ जब्बार खाँ पठाण यांच्या मालकीच्या आरा गिरणीवर कटाई झालेले २२० नग असे ३१.४१६ घनमीटर अवैध लठ्ठा (गोल) लाकूड आढळून आले. यामध्ये जळावू लाकूड २.५० घनमीटर, चिराण लाकूड (कटलेले) ६.१४९ घनमीटर आढळून आले. संबंधित आरा गिरणीवर अवैध आडजात लाकूड आढळून आल्याने मुसा खाँ जब्बार खाँ पठाण यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरागिरणी वनविभागाने सील केली.
आरागिरणी भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली असल्याने भाडेपट्टीवर घेणाऱ्यांची चौकशी होणार आहे. अमरावती वनवृत्ताचे सहायक वनसंरक्षक डॉ. मयूर भैलुमे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांच्या मार्गदर्शनात शेकदरी वर्तुळ क्षेत्र सहायक वनपाल एस. एस. इंगळे, वनरक्षक एम. जी. मनगटे, पी. आर. चावरे, डी. बी. वाघमारे, व्ही. एन. बोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com