कर्जतः कर्जत चार फाट्यावरील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाहनचालकांना आणि जनतेला होणारा त्रास याबाबत मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी लवकरात लवकर खड्डे बुजवा नाहीतर मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल असा इशारा सार्वजनिक
बांधकाम विभागाला दिला होता.
या मनसेच्या इशाऱ्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. MSRDC चे अधिकारी श्री संदीप पाटील यांच्याशी मनसे पदाधिकारी आणि स्वतः जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी चर्चा केल्यानंतर ही खड्डे बुजवण्याची कार्यवाही सुरू झाली. अर्थात नेहमी प्रमाणे राजकारणात कामाचा श्रेयवाद असतोच. त्याकडे दुर्लक्ष करून जनतेत “हे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यामुळे झाल्याची” चर्चा सुरू आहे.
कर्जत चार फाटा कडून कर्जत-मुरबाड, कर्जत-कल्याण, कर्जत _ चौक, कर्जत_ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते, खड्ड्यांमुळे अनेक प्रवाशांना कमरेचे आणि मणक्याचे आजार जडले आहेत. नागरिकांना या रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे तर या खड्ड्यात वाहने चालवताना त्रास सहन करावा लागतो आहे. कर्जत चार फाटा ते चौक या राज्यमार्ग रस्त्यावर अनेक ठिकाणी अर्धवट व संथगतीने रस्त्याची कामे सुरू आहेत. याशिवाय अर्धवट रस्त्यावरील धुळ सर्वत्र उडून नागरिकांना विविध श्वसनाचे आजार जडत आहेत. याशिवाय या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने जनतेत, वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मनसे सदैव जनतेसाठी उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले ते जितेंद्र पाटील यांच्या इशाऱ्यावर सुरू झालेल्या कामामुळे !

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com