१२ हजार हेक्टरचे सिंचन केव्हा : अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
अमरावती : निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अमरावती व अकोला जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनाची स्वप्नपूर्ती जलसंपदा विभागाच्या अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाच्या लालफितशाहीत अडकली आहे.
सन २००८ पासून या सिंचन प्रकल्पावर तब्बल २ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र यंदाचा पावसाळा तोंडावर असताना प्रकल्पाची घळभरणी झालेली नाही. परिणामी, यंदादेखील या प्रकल्पातून सिंचनव्यवस्था निर्माण होईल की नाही, याबाबत हजारो शेतकरी साशंक आहेत. जिल्ह्यातील दर्यापूर व अकोला जिल्हयातील मुर्तिजापूर या खारपाणपट्ट्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, त्यांचे सिंचनाचे हिरवेगार स्वप्न साकारण्यासाठी सन २००८ मध्ये या प्रकल्पाच्या बांधकामास सुरूवात झाली. गेल्या १६-१७ वर्षामध्ये मुळ १६१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प अलिकडे दोन हजार कोटींवर पोहोचला. प्रकल्पबधित गावातील २ हजारपेक्षा अधिक कुटूंब प्रकल्पबाधित झालेत. भूमिहिनदेखील झालेत. तर, कार्यकारी अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे बाधितांचे स्थलांतरण थांबले. त्यामुळे १२,२३० हेक्टर जमिनीवरील, शेतीवरील शाश्वत सिंचनाची सुविधा अद्यापही प्रत्यक्षात उतरलेली नाही. प्रत्यक्षा सिंचन केव्हा सुरू होईल, कालव्यातून पाणी केव्हा सोडले जाईल, हे अधिकारीदेखील सांगू शकत नाहीत. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने सिंचनाचे हिरवेगार स्वप्न गर्भातच गारद झाले आहे.
असा आहे प्रकल्प मुळ प्रशासकीय किंमत : १६१ कोटी बांधकामास सुरूवात : सन २००८ सिंचनक्षमता : १२ हजार २३० हेक्टरबाधित गावः भातकुली तालुक्यातील पाच भू संपादन : १९ गावांची २५३५ हेक्टर जमीनसुधारित प्रशासकीय मान्यता: १६३९ कोटी अशी वाढली किंमत या प्रकल्पाची मूळ प्रशासकीय मान्यतेची किंमत १६१ कोटी रुपयांची होती. २००९ पर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यतेची किंमत ५९४ कोटी रुपयांवर पोहोचली. त्यानंतर हा प्रकल्प ८२७ कोटींवर पोहोचला. त्यानंतर सन २०१६ मध्ये हा प्रकल्प १६३९ कोटींवर पोहोचला. त्यानंतर खर्च वाढताच आहे.
खारपाणपट्ट्यातील पहिला सिंचन प्रकल्प भातकुली तालुक्यातील निंभा येथील निम्न पेढी प्रकल्पाच्या माध्यमातून भातकुली तालुक्यातील ३९ गाव, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील सहा गावांना सुमारे १२ हजार २३० हेक्टर जमिनीवर शाश्वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन २ योजनेअंतर्गत योजने हा प्रकल्प २० टक्के पूर्णत्वास गेला असून, सन २००८ मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली होती.
या प्रकल्पामुळे अळणगाव, कुंड 3 खुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा व गोपगव्हान ही गावे बाधित झाली आहेत.
दर्जेदार पुनर्वसनाशिवाय स्थलांतरण शक्यच नाही. जलसंपदेची स्थलांतरित कुटुंबाची आकडेवारी व प्रत्यक्षातील स्थलांतरीत कुटूंब संख्येत मोठी तफावत आहे.
गौतम खंडारे, सरपंच, अळणगाव

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com