
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त राहिलेले नेते नियमित कामाला लागले, तर कार्यकर्ते रिलॅक्स झाले आहेत. मतदारसंघातील निवडणुकीनंतर स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लोकसभेसाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून बड्या नेत्यांपर्यंत सर्वच निवडणूक मैदानात उतरले होते.
निवडणुकीचा निकाल येत्या दि. ४ जून रोजी लागणार आहे. तोपर्यंत तणावात राहण्याऐवजी महिनाभरापासून अहोरात्र काम केल्यामुळे थकवा आलेले काही नेते व पदाधिकारी भ्रमंतीवर गेले आहेत.
उर्वरित नेते नव्या दमाने कामाला लागले आहेत. लोकसभेच्या प्रचाराच्या माध्यमातून येत्या विधानसभा व महापालिका निवडणुकीमुळे आपले गड कायम राखणे वा भक्कम करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले. प्रचारादरम्यान गुढीपाडवा, आंबेडकर जयंती, राम नवमीसारख्या उत्सवाची पर्वणी लाभली. निवडणुकीनंतर भगवान महावीर जयंती, हनुमान जयजयकारापर्यंत कार्यक्रमातून परत पोहोचण्याचे प्रयत्न झाले. महायुतीकडून भाजपच्या नवनीत राणा आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यात थेट लढत झाली. उभय बाजूचे सर्व पातळीवरील नेते आपली जबाबदारी पार पाडण्यात व्यस्त होते. यात महायुती, महाविकास आघाडीची मोठी फळी मैदानात कायम राहिली; त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांसह, अपक्षही कुठे कमी पडले नाही. नेते व त्यांच्या समर्थकांनी आपापले क्षेत्र सांभाळले. यातील बहुतांश नेत्यांचा पंधरवडा अतिशय व्यस्त राहिला. कार्यकर्त्यांचे ऐक्य, काही नेत्यांकडे पदयात्रा वा सभा नसली तरी, व्यूहरचना व नियोजनात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली, असे तमाम नेते शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आलेल्या विश्लेषणात चिंतन मंथन करून आता रिलॅक्स झाले आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






