अबब! क्षार वाळूघाटातून कोट्यवधीची वाळू लंपास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तिवसा : तालुक्यातील वर्धा नदीपात्रातील क्षार वाळूघाटात ५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईनंतर स्थानिक महसूल विभागाने क्षार वाळूघाटात जाऊन तपासणी केली. आतापर्यंत या वाळूघाटातून अंदाजे पंधरा हजार ब्रास वाळू चोरी गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आजच्या बाजारभावाने चोरी गेलेल्या वाळूची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.

क्षार वाळूघाटातून अवैध उत्खनन होत असल्याचा सुगावा लागताच ५ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेने वाळू घाटावर धाड टाकून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून आठ ट्रक, दोन पोकलेन, दोन चाळणी लागलेले ट्रॅक्टर व एक दुचाकीसह १.७२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तालुक्यात अवैध गौण खनिजावर करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.शासनाने परवानगी दिलेल्या सात क्रमांकाच्या घाटालाच लागून असलेला सहा क्रमांकाच्या क्षार वाळूघाटाची कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु, स्थानिक प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून घाटमालकाने क्षार वाळूघाटातून राजरोस अवैध उत्खनन सुरू केले. मंगळवारी संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी चोरी गेलेल्या वाळूघाटाचे मोजमाप केले. तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या वाळूचे अपहरण झाल्याची माहिती पुढे आली. यामध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. वृत्त लिहेस्तोवर संबंधित प्रकरणाचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. अहवालाअंती वाळूघाटातील घबाड स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गत काही महिन्यापासून वाळू घाटामधून अवैधरित्या उपासा केला जात होता. त्यामुळे आता याप्रकरणी जिल्हा खनिजकर्म विभाग काय कारवाई करतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!