प्राणघातक हल्ला प्रकरण आरोपीस सश्रम कारावास

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : प्राणघातक हल्ला प्रकरणातील एका आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने मंगळवारी (दि. ७ मे) तीन वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात दोघांची निर्दोष मुक्तता केली. ही घटना २९ ऑक्टोबर २०१५ रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाजवळ घडली होती. स्वप्निल ऊर्फ भाम्या भामोद्रे (३० रा. छत्रसालनगर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात निशांत नरवाडे (२९, रा. घनश्यामनगर) व अमोल ऊर्फ गोलू खांडेकर (३४, रा. शेगाव) यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणातील तक्रारकर्त्या हिमानी राऊत व त्यांचा मित्र सोमेश देशमुख हे दोघे खरेदीसाठी गेले होते. खरेदी आटोपल्यावर हिमानी ही आपल्या दुचाकीने सोमेशला सोडून देण्याकरिता हर्षराज कॉलनी येथे जात होती. मार्गात स्वप्निल, निशांत व अमोल हे तिघे दुचाकीने त्यांच्याजवळ आले. त्यातील स्वप्निलने हिमानी यांना बघून इशारे केले, त्यामुळे सोमेशने त्यांना हटकले, त्यावर त्या तिघांनी दुचाकी थांबवायला लावली. तंत्रनिकेतन विद्यालयाजवळ दुचाकी थांबविल्यावर स्वप्निल, निशांत व अमोल या तिघांनी सोमेशसोबत वाद घातला. यावेळी स्वप्निलने कमरेतून चाकू काढून सोमेशवर वार केले. या प्रकरणी हिमानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाअंती आरोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात न्या. एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयात ११ साक्षीदारांची साक्ष तपासली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने स्वप्निल भामोद्रे याला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निशांत व अमोलची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनीत ज्ञानेश्वर घोडेस्वार यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून विजय वाट, देवराव डकरे व अरुण हटवार यांनी काम पाहिले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!