त्या’ विटभट्यावर चालवला बुलडोझर; मजूरांच्या झोपड्याही जमीनदोस्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 


जिल्हा प्रशासनाची कारवाई, उर्वरितांना २० पर्यंत जागा सोडण्याचे आदेश

 

अमरावती7  : शेकडो वीटभट्टी असलेल्या शहरातील कोंडेश्वर मार्गावर बुधवारी सकाळी अचानक महसूल विभाग, पोलिस व महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील एकुण दीड-दोनशे अधिकारी, कर्मचारी जेसीबी व अनेक वाहनांचा ताफा दाखल झाला. सर्व तयारीने सज्ज तो ताफा बघताच येथील वीट भट्टी चालक व हजारो मजुरांचे धाबे दणाणले. काय झाले आणि काय होणार, हे कळेपर्यंत तहसीलदार विजय लोखंडे यांचे आदेश झाले आणि कारवाई ताफा एक्शनमोडमध्ये आला. बुलडोझर सुरु झाले, आणि विटभट्यां व मजूरांच्या झोपड्या जमीनदोस्त होण्यास सुरुवात झाली. वीटभट्ट्यांसह येथील मजूरांच्या शेकडो झोपड्यांवरही बुलडोझर फिरत असल्याचे बघून वीट भट्टी चालक व मजुरांनी सर्व काही जमीनदोस्त करीत सुटलेल्या बुलडोझरची चाके थांबवण्यासाठी जीवाचा आकांत केला. दरम्यान कारवाई पथक व वीटभट्टी चालकांत चांगलाच आमना-सामना झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्त कारवाई थांबविण्याचे निर्देश देत संबंधितांना येत्या २० तारखेपर्यंत सदर जागा खाली करून देण्याची अखेरची तंबी बजावण्यात आली आहे.

शहरातील कोंडेश्वर मार्गावर गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शेकडो वीटभट्ट्या थाटण्यात आल्या आहेत. या वीट भट्ट्यांमुळे या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यासह या परिसरात जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आठशे कुटुंबांसाठी नवी वसाहत निर्माण करण्यात आली आहे. या ठिकाणी लवकरच पोलिसांचे कुटुंब राहायला येणार आहेत. अशा परिस्थितीत या भागात शासनाच्या जमिनीवर अनधिकृतपणे वसलेल्या या वीटभट्ट्या त्वरित हटविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सहा महिन्यांपूर्वीच या भागातील सर्व वीटभट्ट्या चालकांना नोटीस बजावली होती. प्रशासनाच्यावतीने जागा सोडण्याचा इशारा देण्यात आला असताना देखील या भागातील एकही वीटभट्टी चालक येथून हलला नाही. म्हणून सदर कारवाईची पाऊले उचलावी लागल्याचे प्रशासनिक अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासह नायब तहसीलदार टीना चव्हाण, ठाणेदार पुनित कुलट, पटवारी, मंडळ अधिकारी अतिक्रमण विभागाचे 30 कर्मचारी, महसूल विभागाचे 50-60 अधिकारी व 100 पोलिस सहभागी होते.

६ महिन्यापूर्वीच बजावली होती नोटीस
शहराच्या या भागात अनेक वर्षापासून विटभट्टयांचा हा व्यवसाय सुरु आहे. परंतु आता या भागात अनेक महाविद्यालय आहेत. यासह या परिसरात जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील कर्मचार्‍यांकरिता नवीन वसाहत निर्माण करण्यात आलेली आहे. पोलिस कुटूंब देखील या ठिकाणी राहण्यासाठी येणार असल्याने वीटभट्यांमुळे या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुषंगाने जिल्ह प्रशासनाने 6 महिन्यापूर्वी वीटभट्टी मालकांना भट्ट्या हटविण्यासंदर्भात नोटिस दिली होती.

७० भट्ट्या अधिकृत, उर्वरित अनधिकृत
बडनेरा कोंडेश्वर मार्गावर वरुडा, बडनेरा व आलियाबाद 70 अधिकृत व 30 वीटभट्या अनाधिकृत असल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सांगितले. कागदोपत्री जरी 100 वीटभट्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र हि संख्या २५० पेक्षा अधिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कारवाई विरोधात न्यायालयात धाव
वीटभट्टी चालकांनी जिल्हा प्रशासनाच्या या आततायी कारवाईवर विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. वीटभट्टी चालकांनी या कारवाई विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तर दुसरीकडे शासकीय जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी व असून आलियाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी सदर कारवाई केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भर उन्हात हिरावले छत्र, लेकरं उघड्यावर
या कारवाईमुळे आदिवासी मजूरांचे कुटूंब उघड्यावर आले. मजूरांच्या घरात अन्न तर शिजलेच नाही उलट जे झोपडीतील साहित्य होते, ते साहित्य लहान मुले व महिला उचलून झाडांच्या सावलीत ठेवत होत्या. मजूरांनी आता कुठे काम करायचे, कुठे पोटापाण्याची व्यवस्था करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!