
पथ्रोट : शहरातील आठवडी बाजाराजवळ नवीन नालीचे बांधकाम करताना पिण्याच्या पाइप लाइन जवळ नालीतून वाहणारे सांडपाणी आणून सोडल्याने त्या ठिकाणी सुरू असलेल्या लीकेजमधून घरोघरी ते पाणी पोहोचून साथरोग उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आठवडी बाजाराला लागून असलेल्या नागरी वस्ती व व्यावसायिकांच्या दुकानातील सांडपाणी वाहत असलेल्या कच्च्या नालीच्या ठिकाणी ग्रामपंचायतीने नवीन पक्क्या सिमेंट काँक्रीट नालीचे बांधकाम सुरू केले आहे. त्याच भागात समोर महामार्गाला लागून गेलेल्या मोठ्या नालीजवळून जलस्वराज्यची पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन गेली आहे. त्या पाइपलाइनवरून पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील धर्माळला पाणीपुरवठा देण्यासाठी एक स्टॅन्ड पोस्ट काढून ठेवण्यात आले आहे. सध्या ते लिकेज असून, त्या पाइपलाइनमधील पाणी त्या ठिकाणी वाहात आहे. असे असताना नवीन नालीचे बांधकाम करतेवेळी – पाइपलाइनपासून खचका घेऊन बेड – काँक्रीट करून नालीतील सांडपाणी – महामार्गाच्या मुख्य नालीत काढणे गरजेचे होते. परंतु, बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसे न करता पाण्याच्या पाइपलाइनवर थेट नालीचे बांधकाम केले. त्यामुळे आता नालीतील सांडपाणी व पाइपलाइनमधून येणारे लिकेजचे पाणी या दोघांचे मिश्रण होते. ज्यावेळी पाइपलाइनमधील पाणी बंद होईल, त्यावेळी नालीतील सांडपाणी त्या पाइपलाइनमधून लोकांच्या घराघरात पोहोचणार, हे मात्र निश्चित. यापुढे त्या स्टॅन्ड पोस्टचे लिकेज दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा नाली तोडून दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या केलेला खर्च वाया जाणार आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






