
चिखलदरा उन्हाळा लागताच मेळघाटातील विशेषतः चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना आदिवासींना करावा लागतो. त्यानुसार वादग्रस्त खडीमल येथे चार टँकरने दहा फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर दोन टँकर खासगीरीत्या सामाजिक कार्य म्हणून लावण्यात आले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने ३२ – पेक्षा अधिक हातपंप नादुरुस्त आहेत. चिखलदरा तालुक्यात उन्हाळ्यात २५ पेक्षा अधिक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना आदिवासींना करावा लागतो. यंदा बेला, मोथा, – खडीमल, धरमडोह, गौरखेडा बाजार येथे दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रत्येकी गावात एका टँकरद्वारे दोन ते तीन ट्रिप केली जात आहे. खडीमल येथे पिण्याच्या पाण्याची सर्वाधिक चर्चा होत असली तरी मेळघाटातील इतरही आदिवासी पाड्यांची स्थिती अशीच आहे.
खडीमल सहा टँकरने पुरवठा भाजपच्या मेळघाट विधानसभा अध्यक्ष ज्योती सोळंके यांनी मंगळवारी ग्रामपंचायत खडीमल येथे झालेल्या बैठकीत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढला, शासनातर्फे चार टँकर, तर त्यांच्या स्वतः तर्फे सामाजिक कार्य म्हणून दोन टँकर असे सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव, व्हिडीओ जीवनलाल भिलावेकर, सरपंच छोटेलाल जामूनकर, अभियंता खाटकर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तलावाचे होणार खोलीकरण खडीमल येथील पिण्याची पाण्याची भीषण टंचाई पाहता येथे तलावाचे खोलीकरण करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती ज्योती सोळंके यांनी लोकमतशी बोलताना दिली. अधिकाऱ्यांनीसुद्धा सकारात्मकतेने पाणीटंचाई दूर करण्यासाठी कार्यक्रम राबवित असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
हातपंप पडू लागले कोरडे चिखलदरा तालुक्यातील एकूण ३७१ पैकी ३६ हातपंप कायम निकामी असून ३२ हातपंप पिण्याच्या पाण्याची पातळी खालावल्याने बंद पडले आहेत. तुरळक पाच ते दहा हात पंप रोज बंद पडत आहेत. त्यासाठी एकच युनिट दुरुस्तीचे आहे. तालुक्याचा भौगोलिक विस्तार पाहता प्रशासन मागील अनेक वर्षांपासून वेळकाढू धोरण राबवित असल्याचे संतापजनक चित्र आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






