
महाराष्ट्रातून देशी नेतात तर मध्यप्रदेशातुन आणतात गावठी
अमरावती : महाराष्ट्र राज्यातल्या देशी दारूची मध्यप्रदेशात सुरु असलेली तस्करी पोलिसांच्या एका कारवाईत उघडकीस आली. या प्रकरणी शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाळा रोड येथून अवैध दारू तस्करी (वाहतूक) करीत असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून देशी दारू व दुचाकी असा एकुण 78 हजार 400 रुपयांचा माल जप्त केला.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शिरजगाव कसबा ते पाळा रस्त्यावर नाकाबंदी करून ही कारवाई केली. शैलेंद्र कासदेकर (24) व संजू संतोष बारस्कर (24, दोन्ही रा.तुमसर, जिल्हा बैतूल, मध्यप्रदेश) अशी या अटक देशी दारू तस्कर आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात शिरजगाव कसबा पोलिसांकडून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे.
महाराष्ट्रातून देशी नेतात तर मध्यप्रदेशातुन आणतात गावठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातून मध्यप्रदेशात देशी दारू तस्करीची अनेक प्रकरणे दिवसेंदिवस उघडकीस येत असून यामध्ये हातभट्टीची दारू मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणली जाते. त्यामुळे महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात देशी दारूची तस्करी होत असल्याची ही पहिलीच घटना आहे. या दारु तस्करांना दारू विकणार्या या दारू दुकानांवर कारवाई कशी होत नाही?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याकडे स्थानिक पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्षही तितकेच कारणीभूत आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






