
धारणी : मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात धारणी तालुक्याला दोनवेळा वादळ व अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या वादळाने अनेक घरांची पडझड झाली तर उन्हाळी मूग व भुईमूग पिकाला फटका बसला. नारवाटी गावात शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबांना रात्र उघड्यावर काढावी लागली. जवळपास 60 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. दाबिदा गावात भिंत पडल्याने इसमाचा मृत्यू झाला.नारवाटी गावातील सामाजिक कार्यकर्ता इशान सुखदेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे गावात अनेक घरांची पडझड झाली. चिमण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. शनिवार 11 मेच्या सकाळी इतर पक्षी सुद्धा मृतावस्थेत आढळले. घरांची पडझड झाल्याने जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले. विजेचे खांब वाकल्याने तार तुटल्या, पर्यायाने वीज पुरवठा खंडित झाला. जनक्रांती सेनेचे मन्ना दारसिंबे यांनी बिजुधावडी गावाला भेट देऊन पाहणी केल्यावर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याची विनंती केली. बिजुधावडी येथील डझनावर घरांचे नुकसान झाले आहे. दाबिदा गावातील प्रेमलाल श्यामलाल भिलावेकर (38) याचा अंगावर भिंत पडल्याने जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी नितीन बहुरसिया व पोलिस पाटील गजानन जामनिक यांनी पंचानामा करून मृतदेह धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणला. तालुक्यातल्या दाबिदा, खारी, नारवाटी, पाचरपूर, बिजुधावडी, घुटी, टिटम्बा, टिंग, अम्बाडी, रोहणीखेडा व अन्य गावात घरांची पडझड झाली. उन्हाळी पिकांना नुकसान झाले.धारणी शहरालाही वादळ व पावसाचा फटका बसला. अनेक गावातला वीज पुरवठा अद्यापही पूर्ववत झालेला नाही. आदिवासी बांधव अवकाळी पावसाने हैराण झाले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






