
अमरावती : सातव्या वेतन आयोगाची थकबाकी लेखी आश्वासन देऊनही न मिळाल्याने आणि अन्य काही मागण्या प्रलंबित असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवार 14 मेपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. सकाळी 11 वाजता कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली.मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मनपा कर्मचारी संघाने हा विषय लावून धरला. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात आंदोलनही झाले. त्यावेळी मनपा आयुक्तांनी थकबाकी देण्याचे लेखी आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. त्या आश्वासनावरून आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, अद्यापही ती थकबाकी न मिळाल्याने कर्मचारी संतप्त झाले. वारंवार स्मरणपत्र देऊनही थकबाकी मिळत नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याची नोटीस मनपा आयुक्तांना दिली. नोटीसलाही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अत्यावश्यक सेवेत येणारे सफाई, आरोग्य व अग्नीशमन विभागाचे कर्मचारी सहभागी नाही. उर्वरीत सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. त्यांनी प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. संध्याकाही आयुक्तांसोबत संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरली आहे. कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. संघटनेचे नेते प्रल्हाद कोतवाल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






