तिवसा, वरूड तालुक्यात वादळासह गारपीट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

तिवसा/वरूड: वरूड व तिवसा तालुक्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास वादळासह गारपीट झाल्याने संत्र्याचा आंबिया बहार व घरांचे नुकसान झाले आहे. वरूड तालुक्यात वीज पडून गाय ठार झाल्याचे वृत्त आहे.दर एक-दोन दिवसाआड तिवसा तालुक्यात वादळी पावसाचा कुठे ना कुठे कहर सुरू असून मंगळवार, 14 मे रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तालुक्यातील अनेक गावांत वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात भारवाडी गावासह आजूबाजूच्या परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. ज्यात संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतातील मोठ्या प्रमाणात आंबिया बहार गळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

मंगळवार, 14 मे रोजी तिवसा तालुक्यातील भारवाडी, ठाणाठुनी, वरखेड, तिवसा, मोझरी आदी गावाच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. त्याचसोबत भारवाडी व ठाणाठुनी परिसरात जोरदार वादळी पाऊस व गारपीट झाल्याने या परिसरात असलेल्या शेतातील संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात जमिनीवर कोसळून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्याचबरोबर वादळाचा वेग एवढा मोठा होता की, अनेकांच्या घरावरील टीनपत्रे देखील यात उडाले तर अनेक ठिकाणची झाडे अक्षरशः जमिनीच्या खोडापासून उन्मळून खाली पडली. झालेल्या नुकसानीची शासकीय यंत्रणेने पाहणी करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ घातली आहे. भारवाडी परिसरात बोराच्या आकाराची गारपीट झाल्याचे काही गावकऱ्यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे गारांच्या प्रहाराने संत्रा, आंबा यासह पिकांचे नुकसान झाले.

वरूड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवार, 14 मे रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात विजेचा कडाका सुद्धा पहायला मिळाला आहे. काही भागात एकदम छोट्या आकाराच्या गारा सुद्धा पडल्याची माहिती समोर आली आहे. आमपेंड, ढगा, बाभुळखेडा, बेसखेडा, पोरगव्हाण या ग्रामीण भागात विजेच्या कडाक्यासह झालेल्या वादळीवाऱ्याने मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याने सुटलेल्या वादळी वार्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांचा परिवार उघड्यावर आलेला आहे. घरामध्ये भरून ठेवलेले शेतीपिक पावसाच्या पाण्याने ओले झाले आहे. बेसखेडा येथील शेतकर्याच्या भालापूर शेत शिवारातील गायीवर वीज कोसळल्याने गायीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त भागात मंडळधिकारी देवेंद्र गेडाम यांच्यासह या भागातील तलाठ्यांचे पंचनामे सुरू आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!