
अमरावतीः अमरावती मनपा हद्दीत ३०० पेक्षा अधिक होर्डिंग अनधिकृत आहेत. गतवर्षी पोलिसांनी त्याबाबत पोलिसांत तक्रारी देखील नोंदविल्या. मात्र तक्रारीतील मुद्दे हे एफआयआर नोंदवून घेण्यास पुरेसे नसल्याने त्यावेळी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल झाले नाहीत. सबब, त्या होर्डिंगवरील कारवाई सप्टेंबर २०२३ पासून थांबली होती. मात्र कालच्या घाटकोपरच्या घटनेमुळे अमरावती मनपा प्रशासनाने पुन्हा निष्कासनाच्या कारवाईला वेग दिला आहे.
घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६ वरती पोहोचली आहे, तर ८८ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अख्ख्या राज्यातील अनधिकृत, होर्डिंग्जचा मुद्दा चव्हाट्यावर आला. त्या घटनेनंतर नगरविकास विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत होर्डिंग्जच्या निष्कासनाचे आदेश दिले. दीड वर्षापूर्वी शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नेमला. २९ होर्डिंग काढले देखील. मात्र, एजन्सीधारकांनी आयुक्तांना भेटून ते उर्वरित अनधिकृत होर्डिंग्ज नियमानुकूल करून देण्याची विनंती केली. त्यामुळे शहरातील ३०० पेक्षा अधिक होर्डिंग्ज कारवाईविना ‘जैसे थे’ राहिलेत. गतवर्षी ९३ पेक्षा अधिक इमारतीवरील अनधिकृत होर्डिंगधारकाविरोधात कोतवाली व राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र, तो महापालिकेच्या कारवाईचा भाग म्हणून एफआयआर नोंदवून घेण्यास नकार दिला होता.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






