अडीच कोटींच्या खरेदीवर संशय; अखेर कुलगुरूंनी नेमली समिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात काही विभागात उपकरणे, फर्निचर आणि संगणक खरेदीचा प्रस्ताव आहे. त्याकरिता जनरल फंडातून अडीच कोटींच्या निधी घेण्यात येणार आहे. मात्र प्रस्तावित फर्निचर, उपकरण, संगणक खरेदीवर कुलगुरूंनी संशय व्यक्त केला असून या खरेदीतील ‘रिअॅलिटी’ जाणून घेण्यासाठी स्वतंत्र दोन समिती नेमण्यात आल्या आहेत.

गत पाच वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या जनरल फंडात १०० कोटी शिल्लक होते. मात्र आजमितीला या फंडात केवळ चार ते पाच कोटी एवढाच निधी असल्याची विश्वसनीय माहिती आहे. विद्यापीठात अनावश्यक काहीही करायचे असल्यास जनरल फंडालाच छेद दिला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क, मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या विविध शुल्कातून जमा होणाऱ्या जनरल फंडाचे अक्षरशः लचके तोडले जात असल्याचे यापूर्वी अनेक प्रकरणातून पुढे आले आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठात संगणक, उपकरणे फर्निचर खरेदी आवश्यक आहे का? याचे वास्तव जाणून घेण्यासाठी स्वतंत्रपणे समिती नेमली आहे. आता या समितीकडून कुलगुरूंकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर होण्याची प्रतीक्षा आहे. विद्यापीठात खरेदीची प्रक्रिया भांडार विभागातून निविदा प्रक्रियेतून केली जाते. अडीच कोटींच्या खरेदीबाबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

बंद पडलेले जुने संगणक आहे तरी कोठे?

विद्यापीठात मोठ्या प्रमाणात यापूर्वी संगणक खरेदी करण्यात आले आहे. मात्र बंद पडलेले जुने संगणक राईटप न करता नव्याने खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. यात काही लॅपटॉप, टॅब देखील असल्याची माहिती आहे. विविध उपकरणांबाबतही हीच स्थिती असून, बंद पडलेले जुने संगणक आहे तरी कोठे? याचा शोध घेतल्यास मोठे घबाड हाती लागेल, अशी विश्वसनीय माहिती आहे. त्यावर विदयापीठ वर्तुळात मोठे चर्वितचर्वण केले जात आहे.

एकही शिक्षक नाही तरीही चार व्हीलचेअर?

विद्यापीठात एक विभाग असा आहे की तेथे एकही शिक्षक नाही. तरिही या विभागातून चार व्हीलचेअरची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे व्हीलचेअरची मागणी कुणासाठी याचा शोध कुलगुरूंनी नेमलेली समिती घेणार असल्याची माहिती आहे. तसेच शिक्षण विभागात यापूर्वी १५ उपकरणांची खरेदी करण्यात आली, पण ते अद्यापही वापरले नसून बंद पडले आहेत.

अशी आहे समिती फर्निचर, साहित्य खरेदीः रवींद्र सरोदे, के.सी. मोरे संगणक, उपकरणे खरेदी: पी.व्ही. ठाकरे, सुहास पाचपांडे

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!