महिला अवैध सावकाराच्या घरी पडली ‘सहकार’ची धाड, कोरे धनादेश जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात अवैध सावकारी बोकाळली आहे. या व्यवसायात काही महिलादेखील तसूभर कमी नाहीत. चिखलदऱ्यातील एक महिलेच्या तक्रारीवरुन तेथीलच देवी पाईंटजवळ राहणाऱ्या एका महिलेच्या घरी मंगळवारी सकाळी सहकार विभागाच्या पथकाने धाड मारली. यामध्ये अवैध सावकारीबाबत काही दस्तऐवज पथकाला मिळाले.

चिखलदरा येथील एका महिलेने तेथील वनमाला गजानन इंगळे या महिलेच्या अवैध सावकारीबाबत अचलपूर सहायक निबंधकांकडे तक्रार नोंदविली होती. याबाबत पडताळणीत तथ्य आढळले. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या निर्देशानुसार अंजनगाव सुर्जीचे एआर राजेश यादव यांच्या नेतृत्वात पथक गठित करण्यात आले. पथकाने त्या महिलेकडे मंगळवारी सकाळी धाड टाकली. यामध्ये १८ चे वर विविध बँकांचे कोरे धनादेश, काही स्टॅम्प, नोंदवह्या यासह अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे मिळाली. ती सील कागदपत्रे पुढील तपासाकरिता अचलपूर एआर यांच्याकडे वर्ग करण्यात आली. पथकामध्ये धारणी व अचलपूर एआर कार्यालयातील नीलेश सपकाळ, सुमंत अरबट, रूपाली दहातोंडे, निर्मला दहीकर, मोहन वानखडे आदींचा समावेश होता.

तर होईल एफआयआर दाखल कारवाईत जप्त दस्तऐवजांची अचलपूर सहाय्यक निबंधकांद्वारा पडताळणी करण्यात येणार आहे. यानंतर सदर महिलेला याबाबत मौखिक किंवा लेखी म्हणणे मांडण्याची संधी दिल्या जाईल. यामध्ये खुलासा अथवा स्पष्टीकरण संयुक्तिक न वाटल्यास याप्रकरणी सावकारी अधिनियमान्वये एफआरआर दाखल करण्यात येणार असल्याचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले.

चिखलदरा तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नाही पेसा कायद्यामुळे चिखलदरा तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नाही. मेळघाटात फक्त धारणी शहरात १६ परवानाधारक सावकार आहेत. मात्र, या शहराव्यतिरिक्त तालुक्यात एकही परवानाधारक सावकार नाही. चिखलदरा तालुका वगळता उर्वरित १३ तालुक्यांत परवानाधारक ६०२ सावकार आहेत. त्यामुळे मेळघाटात अवैध सावकारीने आदिवासी बांधवांचे आर्थिक शोषण होत आहे.

सहकार विभागाकडे करा तक्रार अवैध सावकारीबाबत नागरिकांनी निःसंकोचपणे सहकार विभागाकडे पुराव्यासह तक्रार करावी. यामध्ये तक्रारदाराच्या नावाची गुप्तता राखली जाते व संबंधितावर कारवाई करण्यात येते.

– शंकर कुंभार, विभागीय सहनिबंधक (सहकार)

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!