
अमरावती : उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नागरिकांचा कल बाहेरगावी जाण्याकडे असल्याने रेल्वे व एसटी महामंडळाच्या बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरीकडे वाढलेली गर्दी कॅश करण्यासाठी खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स संचालकांनी तिकीट दरात मोठी वाढ केली आहे.
एरवी एक हजारात वातानुकूलित बसमध्ये पुण्याला घेऊन जाणारे ट्रॅव्हल्स संचालक १२०० ते १४०० रुपये, तर मुंबईसाठी १३०० ते १५०० रुपये आकारत आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी भाडेवाढ प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी ठरत आहे.
ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या व वर्दळीच्या असलेल्या नागपूर-पुणे मार्गावर असलेल्या अमरावती येथून पुणे, छत्रपती संभाजीनगर, इंदौर या मोठ्या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे अमरावती येथून मोठ्या संख्येने प्रवासी जातात.
सर्वाधिक गर्दी पुणे मार्गावर अमरावती जिल्ह्यातील अनेक तरुण, तरुणी पुणे येथे विविध कंपनीत नोकरीला आहेत. शिवाय शिक्षणासाठीही जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी पुण्याला पसंती देतात. त्यामुळे पुणे येथे जाणाऱ्यांची व तिकडून अमरावतीला येणाऱ्यांची वर्षभर गर्दी असते, सुट्ट्यांमध्ये या मार्गावरील गर्दीत वाढ होते.
पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सकडून जादा पैसे आकारण्यात येतातः मात्र पर्याय नसल्याने ते द्यावे लागतात. कारण रेल्वे सध्या फुल्ल आहेत. त्यात बुकिंग मिळत नाही प्रतीक साखरकर, विद्यार्थी
मी नेहमीच पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स निवडतो. सिझन नसताना ट्रॅव्हल्स संचालक नियमित पैसे घेतात; मात्र सिझनमध्ये ते जास्त पैसे घेतात. कारण सिझनमध्ये रेल्वेतसुद्धा जागा मिळत नाही. – विजय भगत
संचालक म्हणतात :यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्यात मे महिन्यात लग्न समारंभ नसल्याने लांब पल्ल्याचा प्रवास अनेकांनी केला नाही. अनेकदा एका साईडला गाडी रिकामी जाते.त्याचा भुर्दंडसुद्धा बसतो. – मिराज खान, अध्यक्ष ट्रॅव्हल्स
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






