गांजा तस्करीत पकडले, ते अट्टल चोर निघाले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना ब्राह्मणवाडा थडी-शिरजगाव कसबा मार्गावरून अटक केली. त्यांच्याकडून १ किलो ६२३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यांनी घरफोडी व दुचाकी चोरीच्या प्रत्येकी एका गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून ८४ हजार ५४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले. चोचू ऊर्फ रोहित गजानन मरसकोल्हे (२८, रा. कांडली, परतवाडा) व आनंद विकास डायलकर (२३, रा. बोरगाव दोरी, अचलपूर) अशी अटक चोरांची नावे आहेत.

दोन तरुण ब्राह्मणवाडा थडी- शिरजगाव कसबा मार्गाने दुचाकीवरून विक्रीसाठी गांजा घेऊन येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्याआधारे पथकाने ब्राह्मणवाडा थडी शिरजगाव कसबा मार्गावर सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. झडतीत त्यांच्याजवळील एका थैलीमध्ये १ किलो ६२३ ग्रॅम गांजासह १ ग्रॅम सोन्याचे मनी, चांदीच्या दोन तोरड्या व रोख २ हजार २०० रुपये आढळून आले. त्यामुळे त्यांना दागिने व दुचाकीबाबत विचारणा करण्यात आली.

आठनेरमधून चोरल्या दुचाकी आरोपींनी शिरजगाव कसबा ठाण्याच्या हद्दीतील लाखनवाडी येथे घरफोडी व मध्य प्रदेशातील आठनेर येथून दुचाकी चोरी केल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गांजा, सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी व रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, युवराज मानमोठे, रवींद्र वन्हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, नीलेश येते यांनी केली.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!